आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. यामध्ये महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचे अर्ज दाखल होणार आहेत. आणखी काही गावांमध्ये शेवटच्या टप्प्यात निवडणूक बिनविरोध होऊ शकते का? आणखी कोणत्या गटातटासोबत मिळून निवडणुका लढवायच्या याबाबत खल सुरू आहे. यामध्ये गावागावात गटातटात एकमत न झाल्यास दुहेरी, तिहेरी लढती होण्याची शक्यता आहे. जैनवाडीनंतर आणखी किती ग्रामपंचायती बिनविरोध होतात, याबाबतही उत्सुकता आहे.
तहसीलच्या आवारात मोठी गर्दी
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे गर्दी करू नये, सर्वांनी मास्क वापरावेत, याबाबत प्रशासनाकडून वारंवार निकष लावून सूचना दिल्या आहेत. मात्र, तीन दिवसांच्या सुटीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी तालुक्यातील अनेक गावांमधून शेकडो कार्यकर्ते दुचाकी-चारचाकी वाहने घेऊन आले होते. यावेळी एका जागी गर्दी होऊ नये म्हणून अर्ज स्वीकारण्यासाठी चार ठिकाणी सोय केली आहे. मात्र, तहसीलच्या आवारात शेकडो दुचाकी वाहनांसह हजारो नागरिक एकाचवेळी गर्दी करून आवश्यक कागदपत्रे, नामनिर्देशनपत्र भरताना दिसत होते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियम, अटी या भावी सदस्यांनी पायदळी तुडविल्याचे चित्र होते. हा प्रकार आणखी दोन दिवस सुरूच राहणार आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला होता.