सोलापूर, दि. 16 - जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ४५ प्रकारच्या बनावट विदेशी दारुच्या बाटल्यांचे बॉक्स, झाकणं, रि-बॉटलिंग साहित्य, मशीन असा अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुरुवारी शहरातील दमानी नगरमध्ये ही कारवाई करण्यात आली.
निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकीत वाहनांची तपासणी करण्यावर भर दिला आहे. यासाठी निवडणूक आयोगाने पोलीस यंत्रणेला व राज्य उत्पादन शुल्क विभागाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. मिथेनॉलमिश्रित दारूची तस्करी होण्याची शक्यता आहे. तसेच शस्त्रांची व पैशांची तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामीण व शहरातील विविध भागात चेक नाके उभारण्यात आले आहेत.
शहरातील दमानी नगरात मागील काही दिवसांपासून बनावट दारुची निर्मिती होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारुन विविध कंपन्यांचे बनावट ४५ प्रकारच्या दारुचे बॉक्स, रिकाम्या बाटल्या, मशीन व कार असा एकूण ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी प्रमोद नागनाथ जाधव (वय ३५), आप्पा विठ्ठल लवटे (वय ४८) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेले दोघे हे मध्यप्रदेशातून प्लॉस्टीकच्या बाटली मधून दारु सोलापूरात आणत. मुंबई-पुणे येथून नामांकित कंपनीच्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांची खरेदी करून त्यात बनावट दारू भरुन ती विकण्याचा उद्योग आरोपी जाधव हा स्वत:च्या घरीच गेल्या अनेक दिवसांपासून करीत होता. मध्यप्रदेशच्या दारुला महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी बंदी आहे. मुळातच मध्यप्रदेशात दारु अंत्यत स्वस्तात उपलब्ध होते. त्याचा फायदा घेवून आरोपी हे तेथील दारु सोलापुरात विक्रीसाठी आणत असल्याचे ताब्यात घेतलेल्या आरोपीने चौकशी दरम्यान सांगितले.
आरोपीच्या पत्नीच्या नावे कुरुलमध्ये बार
मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे आरोपी प्रमोद जाधव याच्या पत्नीच्या नावे बार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका पथकाने सदर बारवर छापा मारला असून जर तेथे बनावट दारु सापडली तर त्या बारवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांनी सांगितले.