भारतीय संघानं न्यूझीलंड विरुद्धचा सामना जिंकत दुबईचं मैदान गाजवलं अन् देशभरात एकच जल्लोष पाहायला मिळाला. एका बाजूला भारतीय संघाच्या विजयामुळे देशातील वेगवेगळ्या भागात आनंदोत्सव साजरा होत असताना दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशमधील देवरिया येथील पांडे कुटुंबियावर याच दिवशी दु:खाचा डोंगर कोसळला. आठवीत शिकणारी १४ वर्षांच्या मुलीचा ह्रदयविकाराच्या झटका आला अन् यात तिने आपला जीव गमावला. या मुलीच्या निधनानंतर अनेक प्रसारमाध्यमांनी विराट कोहली लवकर बाद झाल्याचे पाहून या मुलीला धक्का बसला अन् तिला ह्रदयविकाराचा झटका आला, असा दावा केला होता. पण या दाव्यात काहीच तथ्य नाही, अशी माहिती आता समोर आली आहे. संबंधित मृत मुलीच्या वडिलांनीच प्रसारमाध्यमांनी केलेला दावा खोटा ठरवला आहे.
VIDEO: दमा दम मस्त कलंदर... रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात MS धोनी- सुरेश रैनाचा भन्नाट डान्स
नेमकं काय घडलं? त्या मुलीच्या वडिलांनी सांगितली खरी गोष्ट
मुलीच्या दु:खद निधनातून सावरताना अजय पांडे यांनी मुलीच्या मृत्यूची घटना विराट कोहलीच्या विकेटशी जोडणं यात काहीच तथ्य नाही असे स्पष्ट सांगितले आहे. आपल्या मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर अजय पांडे यांनी नेमकं काय घडलं त्यासंदर्भातील माहिती दिली. मुलीला ह्रदयविकाराचा झटका आला त्यावेळी मी घरी नव्हतो. न्यूझीलंडचा डाव संपल्यानंतर मी बाजारात गेलो होतो. मला घरून फोन आला अन् प्रियांशी कोसळल्याचं कळलं. घरी गेलो त्यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत होती. रुग्णालयात नेल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले, असे ते म्हणाले आहेत.
जी गोष्ट पसरतीये त्यात काहीच तथ्य नाही
जी दु:खद घटना घडली त्याचा विराट कोहली लवकर बाद होण्याशी काहीही संबंध नाही, असेही त्यांनी सांगितले. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात आम्ही एकत्रित बसून सामन्याचा आनंद घेतला. धावांचा पाठलाग करत असताना भारतीय संघ चांगली कामगिरी करत होता. मुलीसोबत जी दुर्दैवी घटना घडली त्यावेळी कोहली बॅटिंगसाठी मैदानात आलाच नव्हता. त्यामुळे प्रसारमाध्यमातून जी गोष्ट पसरली आहे त्यात काहीच तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील जी दु:खद घटना कोहलीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील विकेट्सशी जोडली गेली ती खोटी ठरली आहे. या सामन्यात विराट कोहली २ चेंडूत फक्त एक धाव करून बाद झाला होता.