गुजरातच्या वडोदरामध्ये एक विचित्र घटना घडली. पाणीपुरीवरून एका महिलेने रस्त्यावर खूप गोंधळ घातला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. महिला पाणीपुरी खायला आली होती. पाणीपुरीवाल्याने तिला २० रुपयांना ६ पाणीपुरी देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु जेव्हा ती खायला आली तेव्हा तिला सहा ऐवजी फक्त चारच पाणीपुरी देण्यात आल्या.
महिला आधी चिडली, मग ढसाढसा रडली आणि रस्त्याच्या मधोमधच बसून राहिली. यानंतर नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी लोकांनी तिच्याभोवती मोठी गर्दी केली. लोकांनी काय झालं हे विचारताच महिला मोठमोठ्याने रडू लागली आणि तिला पाणीपुरी खूप आवडते पण पाणीपुरीवाल्याने तिची फसवणूक केल्याचं सांगितलं.
पाणीपुरीवाल्याने तिला दोन पुरी खायला द्याव्यात यासाठी महिला लहान मुलांप्रमाणे अडून बसली. तसेच याप्रकरणी पोलिसांनी तिची मदत करावी अशी तिची मागणी होती. रस्त्यावर अचानक घडलेल्या या दृश्याने लोकांना आश्चर्य वाटलं आणि अनेक जण यावर हसत होते. गर्दी वाढत असल्याने वाहतूक कोंडी झाली आणि बिकट परिस्थिती निर्माण झाली.
परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून लोकांनी डायल ११२ वर फोन करून पोलिसांना बोलावलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण रडत रडत महिलेने वारंवार २० रुपयांत फक्त ६ पाणीपुरी हवी असल्याची मागणी केली. अखेर खूप प्रयत्नांनंतर, पोलिसांनी महिलेला शांत केलं आणि पोलीस ठाण्यात नेलं. या घटनेचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.