मुंबई:इंडिगोच्या मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या विमानात एका प्रवाशाने दुसऱ्या सहप्रवाशाला कानाखाली मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यामुळे विमान प्रवासातील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
नेमके काय घडले?
इंडिगोच्या '६ ई १३८' या विमानात शुक्रवारी हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात प्रवास करताना दोन प्रवाशांमध्ये काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की, एका प्रवाशाने दुसऱ्याला जोरदार कानशिलात लगावली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक प्रवासी आपल्या सीटवर बसलेला दिसत आहे, तर दुसरा प्रवासी त्याला कानशिलात मारतो. थप्पड मारल्याने मार खाल्लेला प्रवासी वेदनेने रडू लागतो. त्यानंतर दोघांना बाजूला केले जाते.
विमान कंपनीची कारवाई
या घटनेनंतर, विमानाच्या क्रू मेंबर्सनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. विमान कोलकात्याला पोहोचल्यानंतर आरोपी प्रवाशाला विमानतळ सुरक्षा पथकाच्या ताब्यात देण्यात आले. इंडिगोने या प्रवाशाला 'अनुशासनहीन' घोषित केले आहे.
व्हिडीओमध्ये केबिन क्रूचा एक सदस्य 'असे करू नका' असे म्हणताना ऐकू येत आहे. तर, दुसरा प्रवासी 'त्याने कानशिलात का मारली? त्याला कोणालाही मारण्याचा अधिकार नाही' असे म्हणताना दिसत आहे. मात्र, या प्रवाशाला पॅनिक अटॅक आला होता, असे म्हटले जात असले तरी हा वाद नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, ही घटना विमान टेकऑफ होण्यापूर्वी घडली की प्रवासादरम्यान, याबाबतही अधिकृत माहिती मिळालेली नाही. इंडिगोने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.