सुंदर निळ्या डोळ्यांची महाकुंभमध्ये माळा विकणारी व्हायरल गर्ल मोनालिसा आता महाकुंभ सोडून गेली आहे. लवकरच ती मध्य प्रदेशातील महेश्वर येथील तिच्या घरी पोहोचेल. मोनालिसाला तिच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलावं लागलं. महाकुंभ सोडण्याची वेळ आली आहे. व्हायरल झालेल्या मुलीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून हा दावा केला आहे.
सोशल मीडियावर एक व्हि़डीओ शेअर करत मोनालिसाने म्हटलं की, "माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या सुरक्षिततेसाठी, मला इंदूरला परत जावं लागत आहे, शक्य असल्यास, आपण पुढील शाही स्नानादरम्यान, प्रयागराज महाकुंभमध्ये पुन्हा भेटू. सर्वांचे मदतीसाठी आणि प्रेमाबद्दल मनापासून आभार."
"नमस्कार मित्रांनो, मी थोड्याच वेळात महेश्वरला पोहोचणार आहे. जर मला मदत मिळाली तर मी पुढच्या स्नानासाठी नक्कीच येईन. तुम्ही सर्वजण स्वतःची काळजी घ्या. माझ्यावर असंच प्रेम करत राहा आणि माझे व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करत राहा."
आपल्या निळ्या डोळ्यांची जादू पसरवणारी मोनालिसा ही मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील महेश्वरची रहिवासी आहे. मोनालिसाचे पूर्वज सुमारे १५० वर्षांपूर्वी राजस्थानातील चित्तोडगड येथून मध्य प्रदेशात आले होते.
कुटुंबात आईवडील, मोनालिसा, तिची धाकटी बहीण आणि दोन भाऊ आहेत. मोनालिसाने थोडं शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे ती सही करू शकते. सर्व भाऊ-बहिणी, आई-वडील आणि आजी देशभरातील जत्रांमध्ये माळा आणि रुद्राक्ष विकण्यासाठी जातात.
सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे मोनालिसा आणि तिचं कुटुंब माळा विकू शकले नाहीत. माळा खरेदी करण्याऐवजी मोनालिसाला पाहण्यासाठी आणि तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोक येत होते. यामुळे मोनालिसाला तिच्या कुटुंबीयांनी आता घरी परत पाठवलं आहे.