Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होतोय, ज्यात तीन भटक्या कुत्र्यांनी एका घरात शिरुन लहान पिलावर जीवघेणा हल्ला केला. तिघांनी त्या पिलाला अक्षरशः फाडून ठार मारले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
ही घटना घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या व्हिडिओमध्ये तीन कुत्रे एका घरात शिरुन कुत्र्याच्या लहान पिलावर हल्ला केल्याचे दिसते. तिघे त्या पिलाला निर्दयीपणे चावू लागतात. पाळीव कुत्रा पळून जाण्याचा प्रयत्न करतो, तो लहान असल्यामुळे असहाय्य दिसतो. शेवटी त्या पिलाची हालचाल थांबल्यावरच कुत्रे त्याला तिथे सोडून पळून जातात.
या घटनेनंत स्थानिकांमध्ये भटक्या कुत्र्यांबाबत भीती आणि प्रशासनाबाबत रोष व्यक्त होत आहे. ग्वाल्हेर महानगरपालिका आणि प्राणी कल्याण संस्थांनी या मुद्द्याकडे लक्ष देण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली. महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या लसीकरण मोहिमेला गती द्यावी, जेणेकरून अशा घटना रोखता येतील, अशीही मागणी स्थानिकांनी केली.