ब्राझीलमधील एका जोडप्याची जगात सर्वत्र जबरदस्त चर्चा होत आहे. कारण या जोडप्याने जगातील सर्वात यशस्वी लग्नाचा विश्वविक्रम नोंदवला आहे. ब्राझीलमधील मॅनोएल अँजेलिम डिनो (१०५) आणि मारिया डू सुसा डिनो (१०१) यांच्या लग्नाला ८४ वर्षांहूनही अधिक दिवस झाले आहेत. त्यांचे लग्न १९४० मध्ये झाले होते. त्यांच्या लग्नाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लॉन्गीक्वेस्टने पडताळणी केली आहे. या वेबसाइट शंभर वर्षांहून अधिक काळ जगणाऱ्या लोकांची माहिती जतन करतात. या साईटनुसार, या जोडप्याच्या लग्नाला आता ८४ वर्षे ७८ दिवस झाले आहेत.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, मॅनोएल आणि मारिया यांची पहिली भेट १९३६ मध्ये शेतीचे काही काम करताना झाली होती. मात्र, पहिल्या भेटीतच दोघेही एकमेकांना फारसे आवडले नाही. मात्र, चार वर्षांनंतर, १९४० मध्ये जेव्हा दोघेही पुन्हा भेटले, तेव्हा मॅनोएलने मारियाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मॅनोएलने धाडस करून मनातील गोष्ट सांगितली आणि मारियानेही होकार दिला.
सुरुवातीला मारियाची आईचा त्यांच्या नात्याला विरोध होता. मात्र, मॅनोएल यांनी मारिया यांच्या कुटुंबाचे मन जिंकण्यासाठी बरेच परिश्रम घेतले. त्याच वयात त्यांनी घर बांधायलाही सुरुवात केली. थोड्याच दिवसांत घर तयार झाले. यानंत, दोघांमधील जवळीक पाहून कुटुंबानेही लग्नाला होकार दिला. १९४० मध्ये दोघांचेही लग्न झाले. लवकरच, त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. या जोडप्याने आपला दैनंदिन खर्च भागवण्यासाठी शेती केली. या जोडप्याला एकूण १३ मुले झाली, त्यांच्यापासून ५५ नातवंडे झाली आणि आता ५४ पणतवंडेही आहेत.
सध्या, दोघेही १०० वर्षांहून अधिक काळ जगले आहेत. पुढील जीवनही शांततेत जगत आहेत. दीर्घ वैवाहिक जीवनाचे रहस्य उलगडताना, दोघेही म्हणाले, दीर्घ वैवाहिक जीवनासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 'प्रेम'. ते नेहमीच असायला हवे.