बंगळुरूमधील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका व्यक्तीची गोष्ट सोशल मीडियावर लोकांच्या मनाला भिडत आहे. रेडिट पोस्टनुसार, एका ३५ वर्षीय व्यक्तीने त्याच कंपनीत ५००० रुपये दरमहा पगारात कामाला सुरुवात केली आणि आता त्याला वार्षिक ४६ लाखांचं पॅकेज मिळालं आहे आणि तो या टप्प्यावर कसा पोहोचला हे देखील त्याने सांगितले आहे. गरिबी, समर्पण आणि यशाची गोष्ट सांगताना त्याने रेडिट पोस्टमध्ये तो एक इंजिनिअरिंग मॅनेजर असल्याचं म्हटलं आहे.
व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, एका गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला होता, जिथे त्याचे पालक मजूर म्हणून काम करून घराचा खर्च चालवत होते. त्याचं बालपण गावात गेलं आणि काही काळानंतर त्याचे पालक बंगळुरू शहरात काम करण्यासाठी गेले. आपल्या भावना व्यक्त करत त्याने म्हटलं की, "माझी आई दिवसा लोकांच्या घरात काम करायची भांडी घासायची आणि रात्री कपडे शिवायची. तिचे हात नेहमीच आमचं भविष्य घडवण्यात व्यस्त होते."
आईवडिलांच्या अनुपस्थितीत मोठ्या बहिणीने वाढवलं आणि याच दरम्यान तो एका सरकारी शाळेत शिकला. नंतर त्याने फ्री हॉस्टेल आणि जेवण मिळावं म्हणून पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला. त्याच्या भावाला पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळाल्यानंतर, त्याला काही आर्थिक मदत मिळाली आणि त्याला कॉम्पूटर सायन्समध्ये बीटेक करता आलं.
जेव्हा आयटीमध्ये त्याला पहिली नोकरी मिळाली तेव्हा त्याला दरमहा ५ हजार पगार मिळाला, कंपनी बदलण्याऐवजी आणि पगार लवकर वाढवण्याऐवजी त्याने आपलं स्किल्स वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं. कधीही कंपनी न बदलता, त्याला हळूहळू बढती मिळाली आणि आज त्याचे पॅकेज वार्षिक ४६ लाख रुपये आहे. आज तो कामासाठी कॅनडा, अमेरिका आणि यूकेला जातो. त्याने कुटुंबासाठी जमीन खरेदी केली, घर बांधलं आणि कार खरेदी केली आहे.