जेव्हा परीक्षेत कमी गुण मिळतात, आपण यापुढे काहीच करू शकत नाही अशी भावना लोकांच्या टोमण्यामुळे मनात येते. त्यावेळी अशी एखादी संधी तुमच्या आयुष्यात येते आणि सर्वांची बोलती बंद होते तर काय होईल...सोशल मीडियावर एका युजरने त्यांच्या आयुष्यातील हा रंजक किस्सा शेअर केला आहे. ज्यात दहावीत कमी गुण मिळाल्याने अनेक नातेवाईकांनी त्याची खिल्ली उडवली होती.
तू आयुष्यात काही करू शकत नाही असं त्याला ऐकून घ्यावे लागत होते. मात्र युवकाने कमी मार्क मिळवून पुढील शिक्षणासाठी कॅम्प्युटर कोर्स निवडला. तरीही नातेवाईकांकडून अपमानास्पद शब्द कमी झाले नाहीत. अखेर तो दिवस आला जेव्हा त्याच्या बँक बॅलेन्समध्ये लाखो रुपये जमा झाले. याचा फोटो शेअर करत युवकाने त्याच्या आयुष्यात घडलेला प्रसंग शेअर केला आहे. या युवकाची सक्सेस स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका युजरने पोस्टमध्ये लिहिलंय की, त्या लोकांनी माझ्या कॉम्प्युटर कोर्स करण्याची खिल्ली उडवली होती, आज माझ्या बँक खात्यात ३.२५ लाख जमा झालेत. हे माझ्या आई वडिलांसाठी आहे असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलंय. त्याखाली एक फोटो शेअर करत ज्यात बँकेकडून आलेला क्रेडिट जमा मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. मला १० वी ६० टक्के मिळाले होते. गावचा मुलगा, पैशाची अडचण त्यामुळे स्वप्नही फार पाहिले नव्हते. मला आठवतं, माझे नातेवाईक माझी खिल्ली उडवायचे. तू कॉम्प्युटर कोर्स करतोय ना...महिन्याला १-२ लाख कमवशील का असं म्हणत आई वडिलांसमोर माझ्यावर हसायचे. तेव्हा मी काहीच बोललो नाही असं त्याने सांगितले.
नातेवाईकांचे टोमणे ऐकून मी मनातून मोडून जायचो, परंतु तिथूनच माझी सुरुवात झाली. इंजिनिअर केले नाही, ना आयआयटीला गेलो. मी सरकारी पॉलिटेक्निकल शाळेतून कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा केला. यानंतर पुढे काय होणार असं घरचे विचारायचे. मी विचार केला होता की, कोडिंग, ऑटोमेशन अथवा क्लाउड शिकून आज इतका दूर आलो आहे. सुरुवातीला मजबुरी असायची पण आता मज्जा येत आहे भाई, मेहनत कधी लहान नसते, ती कितीही कठीण असली तरी करावी लागते. आज माझ्या अकाऊंटला ३ लाख २५ हजार ९९ रुपये NEFT मधून आलेत. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी रक्कम आहे. मला पैसे दाखवायचे नाहीत, परंतु ज्या गावात १० हजार कमावणे मोठी गोष्ट आहे तिथून येऊन मी ३ लाख कमावतोय असं युवकाने म्हटलं.