Social Viral: स्टार्टअप विश्वातील एक मोठे नाव असलेल्या युअर स्टोरीच्या संस्थापक श्रद्धा शर्मा यांनी ताज हॉटेलच्या फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये आलेल्या अनुभवावरुन संताप व्यक्त केला. श्रद्धा शर्मा यांनी जेवणाच्या टेबलावर पारंपरिक भारतीय पद्धतीनुसार पाय दुमडून बसल्यामुळे त्यांना हॉटेल व्यवस्थापनाकडून अपमानजनक वागणूक मिळाली. या एका घटनेने सध्या एटिकेट्स आणि प्रतिष्ठित सार्वजनिक ठिकाणच्या स्वातंत्र्यावर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण केला आहे. दिवाळीच्या रात्री दिल्लीतील ताज हॉटेलच्या 'हाऊस ऑफ मिंग' रेस्टॉरंटमध्ये आपल्या बहिणीसोबत डिनरसाठी गेलेल्या श्रद्धा शर्मा यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत आपला संताप व्यक्त केला.
नेमका प्रकार काय घडला?
श्रद्धा शर्मा यांचा आरोप आहे की, त्या खुर्चीवर आरामशीरपणे पाय दुमडून (पद्मासनात) बसल्या असताना, रेस्टॉरंटच्या मॅनेजरने त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. मॅनेजरने सांगितले की, इतर काही अतिश्रीमंत पाहुण्यांना त्यांच्या बसण्याच्या पद्धतीवर आक्षेप आहे, त्यामुळे त्यांनी योग्य प्रकारे बसावे. श्रद्धा शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, मॅनेजरने त्यांच्या पारंपरिक भारतीय पोषाख (सलवार-कुर्ता) आणि कोल्हापुरी चपलांवरही टिप्पणी केली आणि 'हे फाईन डायनिंग रेस्टॉरंट आहे, इथे श्रीमंत लोक येतात, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बसा आणि क्लोज्ड शूज घाला' असे सुनावले.
या प्रकाराने आपल्याला प्रचंड अपमानित वाटल्याचे शर्मा यांनी सांगितले. "माझी चूक काय होती? मी फक्त पाय दुमडून बसले होते. आज एक सामान्य माणूस, जो स्वतःच्या मेहनतीने पैसे कमावून प्रतिष्ठेसह ताजमध्ये येतो, त्यालाही या देशात असा अपमान सहन करावा लागतो," अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
श्रद्धा शर्मा यांनी टाटा समूहाबद्दल आणि विशेषतः रतन टाटा जे कधीकाळी त्यांच्या कंपनीत गुंतवणूकदार होते यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. मात्र, ताज हॉटेलमधील हा अनुभव टाटा समूहाच्या नम्रतेच्या आणि आदराच्या मूल्यांशी विसंगत असल्याचे सांगत त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.
शर्मा यांची पोस्ट व्हायरल होताच हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. अनेक युझर्सनी शर्मा यांचे समर्थन करत हॉटेलच्या मॅनेजरच्या वागणुकीला असंवेदनशील ठरवले. एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये भारतीय पारंपरिक पोशाख आणि बसण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेणे हे आजही प्रतिष्ठित ठिकाणी असलेल्या भेदभावाचे प्रतीक आहे, असे म्हटले. तर काही युझर्सनी हॉटेलच्या नियमांचे समर्थन केले. एका युझरने 'ही तुमची चटई नाही, सार्वजनिक जागा आहे. ज्या जागेवर तुम्ही पाय ठेवलेत तिथे दुसरा पाहुणा बसेल,' असा युक्तिवाद करत 'फक्त पैसे मोजले म्हणजे काहीही करण्याचा परवाना मिळत नाही,' असे म्हटले.
या मोठ्या वादंगानंतरही ताज हॉटेल्सने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सोशल मीडिया युझर्सनी 'ताज ब्रँडने' या संवेदनशील मुद्द्यावर सार्वजनिक भूमिका घ्यावी आणि सर्व पाहुण्यांना सन्मानाने वागवावे, अशी मागणी केली आहे.
Web Summary : Shraddha Sharma criticized Taj Hotel after being rebuked for sitting cross-legged at a restaurant. The manager objected to her traditional attire and Kolhapuri chappals, deeming them unsuitable for the fine-dining establishment. The incident sparked debate about etiquette and discrimination.
Web Summary : श्रद्धा शर्मा ने ताज होटल पर पैर मोड़कर बैठने पर आपत्ति जताने का आरोप लगाया। मैनेजर ने पारंपरिक पोशाक और कोल्हापुरी चप्पल पर भी सवाल उठाए, जिससे एटिकेट और भेदभाव पर बहस छिड़ गई। होटल की आलोचना हुई।