भिवंडी: सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेकदा सोशल मीडियावर चुकीच्या गोष्टी व्हायरल होतात. एखादा व्हिडीओ, एखादा फोटो सोशल मीडियावर वेगळ्याच माहितीसह व्हायरल होतो. पण त्या माहितीचा संबंधित फोटो/व्हिडीओशी काहीही संबंध नसतो. अशा परिस्थितीत फोटो, व्हिडीओमधील व्यक्तींना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. असाच काहीसा प्रकार भिवंडीतील म्हस्के कुटुंबीयांसोबत घडला आहे.भिवंडी तालुक्यातल्या ग्रामीण भागात १५ जानेवारीला ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यापैकी पिंपळास ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा आहे. सुजाता म्हस्के आणि कोमल म्हस्के निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोघी शिवसेना पुरस्कृत 'श्री अग्निमाता ग्रामविकास पॅनल'च्या उमेदवार आहेत. वॉर्ड क्रमांक ४ (ड) मधून त्यांना उमेदवारी मिळाली आहे.सुजाता म्हस्के आणि कोमल म्हस्के यांचे फोटो असलेलं बॅनर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यामागचं कारण आहे दोघींच्या पतींची सारखी असलेली नावं. या दोघींच्या पतींचं नाव कल्पेश आहे. 'याला बोलतात डेरींग! दोन्ही बायका एकाच वार्ड मध्ये उभ्या केल्यात', अशा मेसेजसह सुजाता म्हस्के आणि कोमल म्हस्के यांचा फोटो असलेला बॅनर व्हायरल झाला आहे. मात्र प्रत्यक्षात सुजाता आणि कोमल यांचे पती वेगवेगळे आहेत. मात्र कुणीतरी खोडसाळपणे दोघांचा पती एकच असून त्यानं दोघींना एकाच वॉर्डातून उमेदवारी दिल्याचा मेसेज व्हायरल केला आहे.
पतीनं दोन पत्नींना एकाच वॉर्डातून दिली उमेदवारी?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य
By कुणाल गवाणकर | Updated: January 8, 2021 15:33 IST