महाकुंभसाठी कोट्यवधी भाविक उत्तर प्रदेशच्याप्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. कुंभमेळ्यात स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष मिळतो असं म्हटलं जातं. याच श्रद्धेमुळे लाखो भाविक येतात. पण यावेळी कुंभमेळ्यात असं एक दृश्य दिसलं जे सर्वांच्या मनाला भिडलं. सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.
सोशल मीडियावर महाकुंभमधील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक मुलगा त्याच्या वृद्ध आईला कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी खांद्यावरून घेऊन जात आहे. त्याची आई खूप वृद्ध आहे. तिला गंगेत स्नान करण्याचं स्वप्न पडलं होतं. मुलाने आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने तिला खांद्यावर बसवून आणलं.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांना श्रावणबाळाची आठवण झाली आहे. श्रावणबाळाने त्याच्या आईवडिलांना कावडमध्ये बसवून तीर्थयात्रेला नेलं होतं आणि या मुलानेही असंच काहीसं केलं आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की मुलगा त्याच्या आईला भक्तीभावाने आणि प्रेमाने खांद्यावरून घेऊन चालला आहे.
ही घटना सर्वांच्या हृदयाला भिडली. तिथे उपस्थित असलेले लोक या मुलाचं भरभरून कौतुक करत होते.अनेक लोक हे दृश्य पाहून भावुक झाले आहेत. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.