राजस्थानच्या जयपूर येथून धक्कादायक व्हिडीओ समोर आला. सर्पदंशानंतर एका व्यक्तीने सापाला पकडून बॅगेत टाकले आणि तो राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठात पोहोचला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला काय झाले? असे विचारले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने आपल्या बॅगेतून साप बाहेर काढला. हे पाहून डॉक्टरसह रुग्णालयातील कर्मचारीही घाबरले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर येथील एका व्यक्तीला तीन दिवसांपूर्वी सर्पदंश झाला. त्यानंतर तो उपचारासाठी राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठात पोहोचला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, एका व्यक्तीच्या हातात एक बॅग आहे. त्यानंतर तो आपल्या बॅगमधून भलामोठा साप काढतो. हे पाहून रुग्णालयात उपस्थित असलेले लोक घाबरून इकडे- तिकडे धावू लागतात. वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी बोलताना संबंधित व्यक्ती सांगतो की, माझ्या हाततल्या सापाने मला दंश केला आहे. मात्र, या व्यक्तीच्या अशा कृत्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी आलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भिती निर्माण झाली.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी बोलताना सापाला रुग्णालयात घेऊन आलेला व्यक्ती म्हणाला की, त्याला ज्या सापाने दंश केला, तो किती विषारी आहे, हे त्याला जाणून घ्यायचे होते, त्यामुळे तो साप घेऊन रुग्णालयात आला. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे.