शेजारील देश नेपाळमध्ये सुरू असलेल्या अराजकता आणि हिंसाचाराने आता परिसीमा गाठली आहे. एकीकडे मोठा गदारोळ सुरू असताना, आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरत आहे. २९ सेकंदांचा हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये आंदोलकांनी नेपाळी संसद जाळून टाकल्याचे दिसत आहे आणि याच धगधगत्या संसदेसमोर एक तरुण चक्क नाचताना दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ जेन-झी आंदोलनकर्त्या तरुणाचा आहे . देशात हिंसक निदर्शने आणि तणावाचे वातावरण असताना, हे जेन-झी पेटलेल्या संसदेसमोर नाचून आणि गाऊन आनंद साजरा करत आहेत. व्हायरल क्लिप पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे. इतक्या गंभीर परिस्थितीतही कुणी कसं काय, असा आनंद कसा साजरा करू शकतो, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
संसद जाळल्यानंतर जेन-झी नाचले!'gharkekalesh' या एक्स हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, नेपाळी संसद जाळल्यानंतर हा टिकटॉक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, नेटिझन्स वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत.
काय हा मूर्खपणा?एका वापरकर्त्याने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, 'सगळं मूर्खपणा शिगेला पोहोचला आहे. देवाचे आभार मानतो की, भारतात टिकटॉकवर बंदी आहे.' दुसऱ्याने म्हटले की, 'छपरी जेन-झी... स्वतःच्या देशाचे नुकसान करत आहेत.' आणखी एका वापरकर्त्याने लिहिले की, 'हे सगळे आता नियंत्रणाबाहेर जात आहेत.'
संपूर्ण प्रकरण काय?नेपाळमधील परिस्थिती सध्या खूपच तणावपूर्ण झाली आहे. राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने होत आहेत. सोशल मीडियावरील बंदी हटवण्याच्या मागणीसाठी नेपाळी तरुणांनी आंदोलन सुरू केले होते, जे आता हिंसक झाले आहे. आतापर्यंत झालेल्या निदर्शनांमध्ये २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. शेजारच्या देशातील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल दोघांनाही आपल्या पदांचा राजीनामा द्यावा लागला. परंतु या राजीनाम्यांनंतरही निदर्शक शांत झालेले नाहीत आणि ते रस्त्यावर निदर्शने करत आहेत.