Viral Video : सध्या देशभरात सर्वदूर सुखद गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे. जसजसा क्षितिजावर सूर्य येतो तसतशा सूवर्णरेखा उमटून तांबुस रंगाने सारी सृष्टी उजळून निघते. काहीसा सकारात्मकतेची अनुभूती देणारा हा हिवाळा ऋतु प्रत्येकासाठी सारखा नसतो.
थंडीच्या या दिवसांचे चित्रण केलेले असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत असतात. त्यातच नुकताच आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या समोर आलाय. त्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी एक वयोवृद्ध माणूस जळत्या चितेच्या बाजूला झोपलेला दिसत आहे. त्याने असं का केलं असावं, याचं कारण ऐकूण तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. कडाक्याच्या थंडीत स्मशानभूमीत आगीचा आधार घेत हा माणूस झोपलाय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाल्याचे पाहायला मिळतं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील असल्याचे समजतं आहे. सध्या देशभरात थंडी वाढत चालली आहे. वाढत्या थंडीपासून शरीराचा बचाव करण्यासाठी कपाटात पडलेले स्वेटर,कानटोप्या बाहेर येऊ लागल्या आहेत. कानपूरमध्ये तर पारा आठ डिग्रीपर्यंत खाली आलाय. परंतु कानपूर मधील थंडीतील परिस्थिती दाखवणाऱ्या या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कानपुरच्या भैरव घाट येथील स्मशानभूमीत एक चिता जळताना दिसत आहे. या चितेच्या बाजुला हा माणूस झोपला आहे. काही लोकांनी त्या वयोवृद्ध माणसाला प्रश्न विचारल्यास त्याने थंडीपासून बचावाकरिता चितेच्या शेजारी झोपल्याचे उत्तर दिलं. स्मशानभूमीतील हा प्रसंग काहींनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर केला.
पाहा व्हिडीओ -