Kabaddi Players fighting Viral Video : खेळाचं मैदान कधी युद्धाचा रणसंग्राम होईल हे कधीही सांगता येत नाही. जेंटलमन्स गेम असा नावलौकिक असलेल्या क्रिकेटमध्येही धक्काबुक्की किंवा बाचाबाचीचा प्रकार घडताना अनेकदा दिसतो. फुटबॉल किंवा इतर खेळाच्या मैदानावरही हाणामारीचा प्रसंग घडल्याची अनेक उदाहरण आहेत. तशातच आता एका कबड्डीच्या सामन्यात विचित्र प्रकार घडला. कबड्डी कोर्टचा थेट कुस्तीचा आखाडा झाला अन् केवळ हाणामारीच नव्हे तर खुर्च्या फेकण्यापर्यंत तुफान राडा झाल्याचा प्रकार घडला. याबाबतचा व्हिडीओदेखील सध्या व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं? कुठे घडला प्रकार?
शुक्रवारी पंजाबमधील भटिंडा येथे एका आंतर-विद्यापीठ स्पर्धेत तामिळनाडूच्या कबड्डी खेळाडूंमध्ये राडा झाला. असा दावा केला जात आहे की कबड्डी सामन्यादरम्यान, प्रतिस्पर्धी संघाने महिला खेळाडूंवर हल्ला केला आणि नंतर इतर लोकही त्यात सामील झाले. यावेळी खूप गोंधळ झाला. खुर्च्यांची फेकाफेकही झाली. सामनाधिकाऱ्यांच्या एका निर्णयावर खेळाडू नाराज झाल्यानंतर हा राडा सुरू झाला. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एका संघाच्या ठराविक खेळाडूंवर प्रथम प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंनी हल्ला केला. नंतर दरभंगा विद्यापीठाविरुद्धच्या सामन्यादरम्यान मदर तेरेसा विद्यापीठाविरुद्ध झालेल्या 'फाउल अटॅक'मुळे वाद निर्माण झाला. खेळाडूंमध्ये चुकीच्या अपीलवरून वाद सुरू होताच एका कबड्डी सामन्याच्या पंचांनी मदर तेरेसा संघातील एका सदस्यावर हल्ला केला. त्यातून वाद पेटला. पाहा तुंबळ हाणामारी आणि तुफान राड्याचा व्हिडीओ-
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये खेळाडूंमधील भांडण, हाणामारी सगळं स्पष्ट दिसतंय. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून त्यावर नेटकरी व्यक्त होताना दिसत आहेत.