कर्माचे फळ कसे असले ते कर्म केल्यानंतर कळते. आयटी इंजिनिअरने रेडीटवर त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. त्याने सहा वर्षे इमानेइतबारे एका कंपनीत नोकरी केली होती. बॉसकडे १० टक्के पगारवाढ मागितली म्हणून त्याला कामावरून काढण्यात आले. नंतर त्याला ज्याने कामावरून काढले त्यालाही कंपनीने हाकलून दिले.
झाले असे की तो आयटी कर्मचारी डेटा सिंक्रोनायझेशनचे काम तो एकटाच सांभाळत होता. ते करताना ना त्याने वेळ पाहिली ना पोटाची भूक. परंतू, जेव्हा त्याला आपल्या सोबतच्यांचा पगार आपल्यापेक्षा १० टक्क्यांनी जास्त आहे असे समजले तेव्हा त्याने आपल्या बॉसकडे १० टक्के पगारवाढ मागितली. जेव्हा बॉसने त्याला नकार दिला तेव्हा त्याने पिक हवर्स, कामाचे तास आदीकडे कानाडोळा करण्यास सुरुवात केली. काम कमी केले. त्याचा परिणाम कंपनीच्या कामावर दिसू लागला. तेवढ्यात कंपनीचा डायरेक्टर बदलला, नवा माणूस आला. त्याच्या नजरेत कंपनीचे काम नीट सुरु नसल्याचे आले. त्याने त्या इंजिनिअरला बोलवून त्याचे कारण विचारले. तर याने त्याला पगारवाढ दिली नाही म्हणून मी काम कमी केल्याचे कारण सांगितले.
यावर काही त्याची पगारवाढ झाली नाही, परंतू त्याला एचआरने कामात हयगय केल्याचा ठपका ठेवून नारळ हातात दिला. आता हा इंजिनिअर गेल्यावर कंपनीने त्याचे काम करण्यासाठी सहा जण घेतले. त्याच्यासोबतचा एक आणि आलेले सहा जण असे कंपनीने कामावर ठेवले. परंतू, हा एकटा जे काम करायचा ते काही केल्या त्या सात जणांना जमले नाही. बॅकएंड सिस्टीमचे काम बिघडत चालले, ज्या कंपन्या त्यांची सेवा घेत होत्या त्या हातून निसटल्या. कंपनीला मोठे नुकसान झाले. शेवटी कंपनीने जो डायरेक्टर आलेला त्याला हाकलले आणि त्या डायरेक्टरला ज्या उपाध्यक्षाने आणलेले त्यालाही बाहेरचा रस्ता दाखविला.
यावर या आयटी इंजिनिअरने आपल्याला १० टक्के पगारवाढ दिली नसती तर हे घड़ले नसते असे म्हणत मला उलट हसू येत आहे, या जगात कुठे ना कुठे न्यायाची झलक आजही शिल्लक असल्याचे तो म्हणाला.