बंगळुरूच्या एका रिक्षाचालकाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या रिक्षाचालकाबद्दल समजल्यावर सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण हा रिक्षाचालक अस्खलित इंग्रजी बोलतो, त्याला ७ भाषा येतात आणि इतकंच नाही तर त्याने डबल MA केलं आहे, एका एमएनसी कंपनीत काम केलं आहे आणि आयएएस होण्याचं स्वप्न घेऊन यूपीएससीची तयारीही केली.
उच्च शिक्षणानंतरही ही व्यक्ती आता बंगळुरूच्या रस्त्यावर रिक्षा चालवत आहे. कारण त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. पण यातही त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रत्येक परिस्थितीत हसतमुखाने समोर जाण्याचं धाडस खरंच कौतुकास्पद आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हैदराबादचा कंटेंट क्रिएटर अभिनव मैलावरपूने शेअर केला आहे. एका छोट्या प्रवासाने त्याचे विचार कसे बदलले. पुढची १५ मिनिटं त्याच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय क्षण कसे बनले हे सांगितलं आहे.
रिक्षाचालकाने अभिनव आणि त्याच्या मित्रांना एक मजेशीर चॅलेंज दिलं. जर तुम्ही मला COMPUTER चा फुलफॉर्म सांगितला तर मी भाडं आकारणार नाही असं हसत हसत म्हटलं. मुलांना या प्रश्नाचं खरंच उत्तर आलं नाही. तेव्हा रिक्षाचालकानेत Commonly Operated Machine Purposely Used for Trade, Education, and Research असं उत्तर दिलं. तसेच लर्निंगमधून तुम्ही अर्निंग करू शकता म्हणजे पैसे कमावू शकता पण अर्निंगने लर्निंग होत नाही असा संदेशही दिला.
प्रवासादरम्यान रिक्षाचालकाने त्याच्या आयुष्याची गोष्ट सांगितली आणि म्हणाला, "मी IAS ची तयारी केली होती. मी इंग्रजी आणि पॉलिटिकल सायन्समध्ये MA देखील केलं पण अचानक माझं लग्न ठरलं. नंतर मुलं झाली, जबाबदाऱ्या वाढल्या आणि अभ्यास मागे राहिला. अनेक MNC कंपन्यांमध्येही काम करत होता. ते खूप पैसे देत असत, पण ते तुम्हाला पूर्णपणे पिळून टाकतात. इंग्रजी, हिंदी, कन्नड, उर्दू, तेलुगू, मल्याळम आणि तमिळ अशा एकूण ७ भाषा बोलतो."