Viral Video: सोशल मीडियावर भारतीय रेल्वेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये कधी रेल्वेतल्या हाणामारीचे तर प्रवाशांविरुद्ध करण्यात येत असलेल्या कारवाईचे व्हिडीओ असतात. पण सध्या सोशल मीडियावर भारतीय रेल्वेतील असा व्हिडीओ व्हायरल होतोय जो चर्चेच मुद्दा ठरला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्तीने ट्रेनमध्ये झोपलेल्या सहप्रवाशाचे जबरदस्तीने चुंबन घेतले. ज्या प्रवाशासोबत हा सगळा प्रकार घडला त्याला जबर धक्का बसला. त्याने ट्रेनमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यावर किस करणाऱ्याच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार पीडित तरुणाने त्याच्या कॅमेरात कैद केला आहे.
चुंबन घेणारा व्यक्ती त्याच्या कुटुंबासह प्रवास करत होता. त्याची बायको झोपली होती, पण नंतर तो माणूस इतका रोमँटिक झाला की त्याने दुसऱ्याच एका व्यक्तीचे चुंबन घेतले. त्या व्यक्तीच्या या कृतीने तरुण चांगलाच संतापला. हा सगळा प्रकार पाहून सर्वजण थक्क झाले. तरुणाने आरडाओरडा करुन त्या व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली. पीडित तरुण पोलिसांना बोलावण्याची मागणी करू लागला. एखाद्या मुलीसोबत हा प्रकार घडला असता तर लोकांनी कारवाई केली असती पण माझ्यासोबत हे घडल्याने कोणीही काही बोलत नाहीये असं पीडित मुलाने म्हटलं.
निर्मल मिश्रा असे या तरुणाचे नाव आहे. निर्मलने या घटनेचा व्हिडीओ पोस्ट करुन त्याच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. "पुणे-हटिया एक्सप्रेसमध्ये माझा विनयभंग झाला. छत्तीसगड (बिहार नव्हे) येथील एका ३३ वर्षीय व्यक्तीने मला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि मी झोपेत असताना माझे चुंबन घेतले. जेव्हा मी त्याला याबद्दल विचारले तेव्हा त्याने निर्लज्जपणे सांगितले की मला ते आवडले, म्हणूनच मी किस केले. आरपीएफकडे तक्रार केली, पण आम्ही दोघे पुरुष असल्याने त्यांनी माझी तक्रार फेटाळून लावली. तो पत्नीसोबत प्रवास करत असल्याने जमावाने त्याचा बचाव केला. हे वास्तव आहे. जर ट्रेनमध्ये मुलेही सुरक्षित नसतील, तर महिला सुरक्षित राहतील अशी अपेक्षा कशी करू शकतो?," असं निर्मलने म्हटलं.
हीच गोष्ट जर एखाद्या मुलीसोबत किंवा त्याच्या बायकोसोबत झाली असती तर सगळेच बोलले असते. पण माझ्या बाबतीत कोणीच बोलत नाही, असंही निर्मलने म्हटलं. रागाच्या भरात निर्मलने शिवीगाळ केली. यानंतर त्या व्यक्तीने माफी मागितली, पण तो थांबला नाही. निर्मलने त्या व्यक्तीला खेचून बाहेर काढलं आणि खाली आपटलं.
वाद वाढत चाललेला पाहून त्या व्यक्तीची पत्नी रडायला लागली आणि पतीला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. ती महिला रडत माफी मागू लागली. चुंबन घेणाऱ्याच्या पत्नीने सोडा त्याला, जाऊ द्या असं म्हटलं. मात्र हा निर्मलने तिला, 'दीदी, तुम्ही बाजूला व्हा' असं म्हणत आरोपीला खेचून बाहेर काढून चोप दिला.