Hotel Hack To Prevent Guests From Stealing Slippers: बरेच लोक असे असतात जे बाहेरगावी गेल्यावर किंवा फिरायला गेल्यावर हॉटेल्समध्ये थांबतात. अशात हॉटेल्समधून वेगवेगळ्या सुविधा मिळतात. पण असेही लोक असतात जे या हॉटेल्समधील टॉवेल, चप्पल, साबण किंवा शाम्पू चोरी करून आणतात. काही लोक चुकून चप्पल आपल्या सोबत नेतात तर काही ठरवून नेतात. सामान्य तर सोडा मोठमोठे सेलिब्रिटी लोकही असं करतात. अशात अशा लोकांमुळे हॉटेलची डोकेदुखी चांगली वाढते. त्यामुळे मुंबईतील एका हॉटेल व्यवस्थापनानं यावर एक जबरदस्त तोडगा शोधला आहे. चप्पल चोरी रोखण्यासाठी या हॉटेलनं जे केलं त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
हॉटेलनं केली अनोखी ट्रिक?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर बंगळुरूच्या थेजस्वी उदुपानं त्याच्या अकाऊंटवर हॉटेलच्या ही अनोखी आयडिया पोस्ट केली आहे. ज्यावर लोकांच्या भरपूर कमेंट्स येत आहेत. एक फोटो पोस्ट करत त्यानं कॅप्शनला लिहिलं की, 'व्हायरल झालेल्या या मजेदार फोटोमध्ये हॉटेलच्या टॉवलवर ठेवलेली चपलेची जोडी दिसत आहे. खास बाब ही आहे की, ही चप्पल वेगवेगळ्या रंगाची आहे'. या यूजरनं मुंबईतील या हॉटेलचं नावही शेअर केलं आहे. या पोस्टवर हजारो लोकांनी अनेक मजेदार कमेंट्स केल्या आहेत.
व्हायरल झालेल्या या हॉटेलच्या पोस्टवर लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी ही आयडिया खूप चांगली असल्याचं म्हटलं. तर काही लोकांना वाटतं लोक कशीही चप्पल चोरी करू शकतात. पोस्टवर एका यूजरनं लिहिलं की, "चप्पल चोर लोकांना यानं काही फरक पडणार नाही". तर दुसऱ्यानं लिहिलं की, "ही चप्पल मी चोरी करणार...इतकाही फरक नाहीये".
दरम्यान सोशल मीडियावर चप्पल चोरी रोखण्यासाठी केलेल्या आयडियावर वादही पेटला आहे. काहींनी प्रश्न उपस्थित केला आहे की, खरंच असं करून चप्पल चोरी रोखली जाईल का? आता हॉटेलच्या या निर्णयानं चप्पल चोरी थांबते की नाही हे माहीत नाही. पण सध्या याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.