अमेरिकेतील लुब्बॉस येथील रहिवासी असलेल्या सहा वर्षांच्या विटन डॅनियलचं अचानक डोकं दुखू लागलं आणि चक्कर आलं. त्याला चालणं, बोलणं आणि श्वास घेणं देखील कठीण झालं. डॉक्टरांशी संपर्क साधला असता, सुरुवातीला फ्लू असल्याचं सांगितलं, परंतु नंतर त्यांना मूळ कारण अधिक गंभीर असल्याचं समोर आलं. विटनची आई केसी डॅनियलने गुगलवर सर्च केल्यानंतर तिला धक्कादायक प्रकार समजला.
न्यूयॉर्क पोस्टमधील एका रिपोर्टनुसार, विटनची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात नेण्यात आलं. सुरुवातीला डॉक्टरांनी त्याला फ्लू असल्याचं निदान केलं. मात्र पुढील २४ तासांत त्याची प्रकृती बिघडली. हळूहळू, विटनला श्वास घेण्यास, बोलण्यास आणि चालण्यास त्रास होऊ लागला. तो काही वेळातच बेशुद्ध पडला. डॉक्टरांनी ताबडतोब त्याला इंट्युबेट केले आणि टेस्ट केल्या, ज्यामध्ये फ्लूपेक्षाही गंभीर स्थिती उघड झाली. या स्थितीला कॅव्हर्नस मालफॉर्मेशन किंवा कॅव्हर्नोमा म्हणतात.
५०० पैकी फक्त एकालाच याचा त्रास होतो. अलायन्स टू क्युअरच्या मते, अनेक रुग्णांना कधीच लक्षणे दिसून येत नाहीत. कॅव्हर्नोमाच्या लक्षणांमध्ये रक्तस्त्राव होणे, डोकेदुखी, अशक्तपणा आणि दृष्टी समस्या यांचा समावेश आहे. २० टक्के रुग्णांमध्ये हा आजार जेनेटिक असतो. डॉक्टरांनी विटनची आई केसी डॅनियल यांना उपचारांच्या दुष्परिणामांबद्दल इशारा दिला होता की, जरी विटन जिवंत राहिला तरी तो कधीही चालू शकणार नाही आणि आयुष्यभर व्हेंटिलेटर आणि फीडिंग ट्यूबवर अवलंबून राहावं लागेल. त्याच्या उपचाराच्या फक्त दोन आठवड्यांपूर्वी, विटनला त्याच्या बेसबॉल संघातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आलं होतं.
विटनच्या आईने यासाठी गुगलची मदत घेतली. या आजाराबद्दल माहिती शोधत असताना, तिला ह्यूस्टनमधील यूटी हेल्थ हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन डॉ. जॅक मोरकोस यांचा एक लेख सापडला. डॉ. जॅक्स कॅव्हर्नोमाच्या उपचारात तज्ज्ञ आहेत. केसी यांनी डॉ. मोरकोस यांना ईमेल पाठवला आणि त्यांनी लगेचच त्याचं उत्तर दिलं आणि विटनला ह्यूस्टनला आणण्याबाबत सांगितलं.
विटनला एअर अॅम्ब्युलन्सने ह्यूस्टनला नेण्यात आलं, जिथे डॉ. मोरकोस आणि बालरोग न्यूरोसर्जन डॉ. मनीष शाह यांनी चार तासांची सर्जरी केली. काही तासांतच, विटन शुद्धीवर आला आणि स्वतः बोलू आणि श्वास घेऊ शकला. सहा आठवड्यांनंतर, तो बरा झाला आणि त्याच्या सातव्या वाढदिवसापूर्वी घरी परतला. तो आता शाळेत जातो आणि बेसबॉल खेळतो.