एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून आपली व्यथा मांडली आहे. तरुण म्हणाला की, एका समस्येचं निराकरण करण्यासाठी दिवसाचे १३ तास काम करूनही हळू काम केल्याबद्दल त्याला ओरडा बसला. यानंतर तो निराश झाला. रेडिटवर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
आयटी इंडस्ट्रीमध्ये फ्रेशर असलेल्या तरुणाने लिहिलं की, गेल्या वर्षी कॉलेजमधून ग्रॅज्युएट झालो. एका समस्येचे निराकरण करण्यासाठी मला १३ तासांपेक्षा जास्त वेळ लागला. समस्या सोडवल्यानंतर मी खूप आनंदी होतो, पण एका टीम मीटिंगमध्ये, माझा मॅनेजर मला सर्वांसमोर मी स्लो असल्याचं म्हणत माझ्यावर ओरडला. यामुळे मी आतून तुटलो आहे.
फ्रेशरवर टाकला दोष
हे फक्त एवढ्यावरच थांबलं नाही. जेव्हा नवीन टेक एक्सपर्टने मॅनेजरच्या टीममधील एका सीनियरला विचारलं की, कामासाठी इतका वेळ का लागला, तेव्हा त्याने संपूर्ण दोष फ्रेशरवर टाकला. टेक एक्सपर्टच्या मते, कामाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला कारण काही फाईल्स गहाळ होत्या.
फाईल्स गहाळ झाल्याचं लपवलं
जेव्हा माझ्या व्यवस्थापकाने माझ्या मेंटरला विचारलं की, कामाला इतका वेळ का लागला, तेव्हा तो खोटं बोलला आणि संपूर्ण दोष माझ्यावर टाकला. खरं कारण सांगितलं नाही, फाईल्स गहाळ झाल्याचं लपवलं असं तरुणाने म्हटलं आहे.
ऑफिस पॉलिटिक्सचा बसला फटका
तरुणाने रेडिटपोस्टमध्ये कबूल केलं की, या घटनेनंतर तो खूप निराश झाला होता आणि त्याला टीम सोडायची होती. मात्र त्याला फोरमवरील अनेक अनुभवी कर्मचाऱ्यांकडून पाठिंबा मिळाला, ज्यांनी तिला ऑफिस पॉलिटिक्स कसं हाताळायचे याबद्दल टिप्स दिल्या. तरुणाच्या या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.