महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक असलेल्या लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी झाली. महिलांनी जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरच गोंधळ घातल्याने वाहतूक ठप्प झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी महिलांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतरच मिटला, असे सांगण्यात आले. ही घटना रविवारी दुपारी घडल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा परिसरातील जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये महिला एकमेकांशी भांडताना आणि केस ओढताना दिसत आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची समजूत काढूनही या महिला कोणाचेही ऐकायला तयार नव्हत्या. त्यांच्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा संपूर्ण प्रकार काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे.
लोणावळ्यातील वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना या भांडणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून भांडणाऱ्या महिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु या महिला दारूच्या नशेत होत्या आणि त्यांना पोलिसांची भीती वाटत नव्हती. काही वेळाने येथील व्यापाऱ्यांनी या महिलांना पोलिस ठाण्यात नेले. याप्रकरणी लोणावळा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. एकाने म्हटले आहे की, "आपला महाराष्ट्र बदलतोय आणि माणसंही. भरदिवसा अशा घटना वाढत आहे, यामुळे आपल्या नवीन पिढीसमोर काय आदर्श ठेवणार?" दुसऱ्याने म्हटले आहे की, "आपले @DGPMaharashtra इतके हतबल कधी वाटलेच नव्हते. काय झाल आहे की हुल्लडबाजी थांबतच नाहीये फक्त ठिकाणे आणि लोकं बदलत आहेत."