DNA Test : जीवनात अशा काही गोष्टी असतात ज्या समोर आल्यावर असं वाटतं की, त्या समोर नसत्याच आल्या तर बरं झालं असतं. पण या ना त्या कारणानं या गोष्टी आपल्या समोर येत असतात किंवा आणल्या जातात. तर कधी कधी चुकूनही अशा गोष्टी आपल्या समोर येतात, ज्या नकोच व्हायला होत्या. मात्र, काही गोष्टी अशा असतात ज्या कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्या आपला पिच्छा सोडत नाहीत. एका तरूणीसोबत असंच काहीसं झालं. या तरूणीनं गमतीत डीएनए टेस्ट केली आणि तिला तिच्या परिवाराचं एक रहस्य समजलं.
तरूणीला तिच्या आत्यानं एक डीएनए किट गिफ्ट केली होती. ही किट तरूणीनं गंमत म्हणून वापरली. तरूणीला जराही अंदाज नव्हता की, या किटचा वापर केल्यावर तिच्या समोर जे येईल त्यानं तिला धक्का बसेल आणि घर उद्ध्वस्त होईल. घरातील लोकांनी कित्येक वर्षांपासून लपवून ठेवलेली गोष्टी तिला समजली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्न रेडिटवर तरूणीनं लिहिलं की, डीएनए टेस्ट तिच्यासाठी एखाद्या भीतीदायक कथेसारखी झाली. या टेस्टनं तिचं विश्वच बदलून गेलं.
तरूणीनं लिहिलं की, तिच्या आत्यानं तिला सुट्ट्यांदरम्यान एक डीएनए किट गिफ्ट केली होती. तिनं जेव्हा याचा वापर केला तेव्हा तिला समजलं की, तिला १० सावत्र बहीण-भाऊ आहेत. तरूणी हैराण झाली कारण तिला घरात एकच लहान बहीण आहे. जेव्हा तिनं याबाबत आई-वडिलांना विचारलं तर त्यांनी असं काही नसल्याचं सांगितलं. मात्र, नंतर तिच्या वडिलांनी मान्य केलं की, डीएनए टेस्टचा रिझल्ट बरोबर आहे. तरूणी ज्या व्यक्तीला ती पिता समजत होती, ती व्यक्ती तिचा जैविक पिता नाहीच. तर ती स्पर्म डोनरच्या माध्यमातून जन्माला आली होती.
जन्माबाबतचं सत्य समोर आल्यानंतर पूर्ण परिवार उद्ध्वस्त झाला. लोकांनी कमेंट करत अंदाज व्यक्त केला की, कदाचित तिच्या आत्यानं मुद्दामहून तिला डीएनए टेस्ट किट दिली असेल. तर काही लोकांनी तिच्याबाबत सहानुभूती व्यक्त केली आहे. बऱ्याच लोकांनी तरूणीला सल्ला दिला की, जर तिचे वडील तिच्यावर प्रेम करत असतील तर तिने याबाबत फार विचार करू नये. तर काही लोकांनी त्यांचा अनुभवही शेअर केला की, त्यांना सुद्धा त्यांच्या वडिलांबाबत असंच समजलं होतं.