छत्तीसगडच्या जांजगीर-चंपा जिल्ह्यातील बालोदा विभागात एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली. या प्रकरणी मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले.
नेमके काय घडले?
ही घटना लेवई गावातील सरकारी प्राथमिक शाळेत घडली. मुख्याध्यापिका हिरा पोर्टे (वय, ४५) यांनी दुपारच्या जेवणानंतर दारूच्या नशेत टेबलावर पडल्याची दिसली. मुख्यधापिका इतक्या मद्यधुंद अवस्थेत होत्या की, त्यांना उभे राहता येत नव्हते. शाळेचा दिवस संपला असे समजून मुले घरी गेली. गावकऱ्यांनी त्यांचा व्हिडीओ काढला. या व्हिडीओत त्या हिंदी आणि इंग्रजीत बोलताना दिसत आहेत.
मुख्याधापिकेबद्दल तक्रारी दाखल
या शाळेत ४५ विद्यार्थी असून, मुख्याध्यापिका आणि एक शिक्षिका कार्यरत आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापिका गेल्या काही दिवसांपासून मद्यधुंद अवस्थेत शाळेत येत होत्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. यापूर्वीही त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.
निलंबनाची कारवाई
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी जन्मेजय महोबे यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या मुलाखती घेऊन घटनेची पुष्टी केली. चौकशीनंतर २० सप्टेंबर रोजी मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले.
कडक कारवाईचा इशारा
जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य देखरेख न ठेवल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी आणि बीआरसी बालोदा यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, शिक्षण व्यवस्थेचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
पतीच्या निधनानंतर दारू पिण्यास सुरुवात
मुख्याध्यापिका पतीच्या मृत्यूनंतर दारू पिण्यास सुरुवात केली, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. या चालू शैक्षणिक वर्षात छत्तीसगडमध्ये अशा प्रकारे महिला शिक्षिकेला शाळेत मद्यधुंद अवस्थेत पाहण्याची ही पहिलीच घटना आहे.