Viral Video: रस्त्यावर फिरणारे वळू आणि गायींमुळे नागरिकांना होणारा त्रास नवीन नाही. अनेकदा हे वळू नागरिकांना जखमी करतात. वाहनांना उडवतात. त्यांची झूंज लागते तेव्हा मालमत्तांचं नुकसान होतं. पण, हे सगळं रस्त्यावर होणं एकवेळ ठीक, पण जेव्हा वळू घरात घुसतो आणि बेडरुममध्ये धिंगाणा घालतो तेव्हा काय? कारण अशीच एक घटना आता घडली आहे. गाय घरात घुसल्यानंतर वळूही घरात शिरला. गाय आणि वळू बेडरुममध्ये येताना बघून महिला कपाटात लपली. तब्बल दोन तास हा गोंधळ सुरू होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हरयाणातील फरिदाबादमध्ये २६ मार्च रोजी ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फरिदाबादमधील डबुआ कॉलनीत वळूने हैदोस घातला. डबुआ कॉलनीतील ३३ फुटी रोडवर बी ब्लॉकमध्ये राकेश साहू यांचे घर आहे. पत्नी, मुलं आणि आईसोबत ते राहतात. सुदैवाने ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मुले एका नातेवाईकाच्या घरी गेलेले होते.
वळू बेडरुममध्य कसा घुसला?
राकेश साहू यांनी सांगितले की, त्यांची आई काही कामानिमित्ताने बाहेर गेली. पण, बाहेर जाताना तिने दरवाजा उघडाच ठेवला. काही वेळाने वळू मागे लागल्याने एक गाय घरात घुसली. वळूही घरात घुसला. दोन्ही जनावर बेडवर चढले.
वळू आणि गाय घरात घुसत असताना पाहून राकेश साहू यांची पत्नी कपाटात लपली. काही वेळाने राकेश साहू यांची आई घरी आली तेव्हा त्यांना घरात वळू घुसल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे सोसायटीतील लोक जमा झाले.
लोकांनी वळूला बाहेर कसं काढलं?
घराच्या बाहेर लोक जमा झाले. त्यांनी वळू काठीने दाखवून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अंगावर थंड पाणी टाकले. इतकंच काय तर तो घरातून बाहेर निघावा म्हणून फटाकेही फोडले. पण, यापैकी काहीही कामी आले नाही आणि वळूचा धिंगाणा सुरूच राहिला.
त्यानंतर एक शेजारी त्यांचा कुत्रा घेऊन आले. कुत्र्याने घरात वळू घुसल्याचे पाहून भुंकायला सुरू केले. कुत्रा भुंकायला लागल्याने वळू बाहेर पडला आणि त्यानंतरही गाय पण बाहेर आले. तब्बल दोन तास हा सगळा गोंधळ सुरू होता. या काळात राकेश साहू यांची पत्नी कपाटात जीव मुठीत धरून बसलेली होती.
घरात घुसलेल्या वळूचा व्हिडीओ
घरात घुसलेल्या वळूने सामानाची नासधूस केली. वळू बेडवरही चढला होता. त्यामुळे बेडचेही नुकसान झाले. हा प्रकार घडल्याने परिसरातील रहिवाशी रस्त्यावरील जनावरांमुळे दहशतीत आहेत. रस्त्यावरील या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जात आहे.
जानेवारी महिन्यातच पंजाब हरयाणा उच्च न्यायालयाने फरिदाबाद शहर मोकाट जनावरांपासून मुक्त करण्याचे आदेश दिले होते. पण, त्यावर मनपा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली गेलेली नाही.