Viral Video:ब्राझीलच्या एका पत्रकाराचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा पत्रकार ईशान्य ब्राझीलमधील बाकाबल येथे एका बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचे लाईव्ह रिपोर्टिंग करत होता. पत्रकार पाण्यात उतरून रिपोर्टिंग करत असताना अचानक त्याच्या पायाखाली एक मृतदेह आला. मृतदेह पायाखाली आल्याने तो माणूस घाबरला आणि पाण्यातून बाहेर येऊ लागला. त्यानंतर तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
ब्राझीलमधील एक मुलगी बऱ्याच दिवसांपासून नदीत बेपत्ता झाली होती. बराचवेळ शोधमोहीम राबवूनही तिला शोधण्यात यश आले नाही. पण एका पत्रकाराला लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला. ही घटना ईशान्य ब्राझीलमधील बाकाबल शहरात घडली. १३ वर्षांची मुलगी रायसा ही तिच्या मैत्रिणींसोबत पोहण्यासाठी मेरीम नदीत गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली.
पत्रकार लेनाल्डो फ्रेझाओ मेरिम नदीत सद्य स्थितीचे लाईव्ह रिपोर्टिंग करत होते. ते नदीच्या आत कंबरेपर्यंत पाण्यात उभे होते आणि सांगत होते की ही तिच जागा आहे जिथे ती मुलगी शेवटची दिसली होती. मग ते घाबरले आणि कॅमेऱ्यासमोर म्हणाले की मला पाण्याखाली काहीतरी आदळत असल्याचं जाणवत आहे. "मला वाटतं की इथे पाण्याखाली काहीतरी आहे. तळाशी काहीतरी आहे, नाही, मी पुढे जाणार नाहीये, मला भीती वाटतेय. तो हात असल्यासारखा वाटतोय - ती मुलगी असू शकते का? पण तो मासा देखील असू शकते. मला नक्की माहित नाही," असं पत्रकार लेनाल्डो फ्रेझाओ कॅमेरासमोर म्हणत होते.
या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि डायव्हर्सच्या पथकाने पुन्हा शोध मोहीम सुरू केली. पत्रकार ज्या ठिकाणी लाईव्ह रिपोर्टिंग करत होता त्याच ठिकाणी रायसाचा मृतदेह सापडला. शोध मोहिमेदरम्यान, डायव्हर्संना पत्रकार लेनाल्डो जिथे उभा होते त्याच ठिकाणी मुलीचा मृतदेह आढळला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.
शवविच्छेदन अहवालानुसार, मुलीचा मृत्यू बुडून झाला होता. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा नव्हत्या. त्याच दिवशी मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ब्राझीलमध्ये घडलेल्या या घटनेची सोशल मीडियावरही बरीच चर्चा होत आहे.