सोशल मीडियावर जवळपास १२ वर्षे जुनं प्रकरण वेगाने व्हायरल होत आहे, जे जर्मनीतील एका बँकेशी संबंधित आहे. २०१२ मध्ये एका बँक कर्मचाऱ्याने चुकीच्या खात्यात २२२ मिलियन युरो (तब्ब १९९० कोटींहून अधिक) ट्रान्सफर केले होते आणि हे सर्व घडले ते कामाच्या दरम्यान लागलेल्या एका डुलकीमुळे झालं आहे. या चुकीमुळे बँकेने त्याला नोकरीवरून काढून टाकलं होतं, मात्र न्यायालयाने या कर्मचाऱ्याला दिलासा देत पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया...
२०१२ मधील हे प्रकरण आहे. बँकेच्या क्लार्कच्या चुकीमुळे चुकीच्या खात्यात मोठी रक्कम ट्रान्सफर झाली होती. बिझनेस टुडेवर प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, जर्मनीतील एका बँकेत काम करणाऱ्या एका क्लार्कला ग्राहकाच्या खात्यात फक्त ६४.२० युरो पाठवायचे होते, परंतु हे काम करताना तो झोपला आणि कॉम्पुटरच्या की-बोर्डवरच त्याचं बोट राहिलं. याचा दुष्परिणाम असा झाला की, ६४ युरोच्या रकमेऐवजी २२२ मिलियन युरो त्या खात्यात ट्रान्सफर केले गेले.
चुकीमुळे कर्मचाऱ्याची गेली नोकरी
रिपोर्टनुसार, ही बाब निदर्शनास येताच एकच गोंधळ उडाला आणि दुसऱ्या बँकेच्या कर्मचाऱ्याने त्वरीत चूक पकडली आणि ट्रान्जेक्शन स्टॉप केलं. मात्र या प्रकरणात मोठा निष्काळजीपणा उघडकीस आला असून क्लार्कशिवाय सुपरवायजर याच्याही कामावर प्रश्न उपस्थित झाला. त्याने कसं अप्रूव्हल दिलं असं म्हटलं. या चुकीमुळे संबंधित कर्मचाऱ्याला बँकेने बडतर्फ केले, त्यानंतर जर्मन बँकेशी त्याची कायदेशीर लढाई सुरू झाली.
न्यायालयाने दिला हा निर्णय
मोठ्या कायदेशीर लढाईनंतर जर्मनीच्या हेसे राज्यातील लेबर कोर्टाने या प्रकरणी आदेश दिला. या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्याचा बँकेचा निर्णय चुकीचा ठरवला आणि क्लार्कने जाणूनबुजून ही चूक केली नसल्याचं म्हटलं आहे. न्यायालयाने म्हटलं की, कर्मचाऱ्याने त्याच्या चुकीकडे दुर्लक्ष केलं असलं तरी त्याला त्याच्या कृत्यासाठी बडतर्फ केलं जाऊ नये.