Social Viral : काल संपूर्ण देशभरात धूळवडीचा उत्साह पाहायला मिळाला. होळी आणि धूळवडीच्या पूर्वीचाच उत्साह आणि धमाल यंदाही पाहायला मिळाली. तरुणाईने मोठ्या जल्लोषात एकत्र येऊन धूळवड साजरी केली. बच्चेकंपनीने तर गुलालाची उधळण करत एकमेकांना भिजवत मज्जा केल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर होळीचे, धुळवडीचे व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. सामान्यांपासून ते ,सेलेब्रिटींचे धमाल करतानाचे रिल्स तुम्हीही पाहिले असतीलच. पण या व्यतिरिक्त सध्या इंटरनेट एका तरुणीचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये, चालत्या स्कुटीवर उभी राहून एक तरूणी स्कुटी चालवणाऱ्या तरुणाला रंग लावताना दिसत आहे. बेभान होऊन भरधाव वेगात हे दोघं रस्त्यावरून स्कु़टीवरून जाताना दिसतायत. वाहतूकीचे नियम पायदळी तुडवत ही मुलगी मागच्या सीटवर उभी राहून, दोन हात मोकळे सोडून हुल्लडबाजी करताना दिसत आहे. मात्र, हे कृत्य त्या तरूणीला चांगलच भोवलं आहे. अचानक रस्त्यावर स्कुटीसमोर कार येते आणि तेवढ्यात चालक मुलगा ब्रेक मारतो, त्यामुळे स्कुटीवर उभी असणारी मुलगी रस्त्यावर जोरदार आपटते.
एक्सवर शेअर करण्यात आलेल्या हा व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील असल्याचा सांगितला जात आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. ''यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी'' अशी मागणी देखील काहींनी केली आहे.