आपल्याकडे लग्न करण्यासाठी सरकारने वयाची अट ठेवली आहे. यासाठी नियम बनवले आहेत. पण, अनेक ठिकाणी कमी वयामध्ये मुलींची लग्न लावून देत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता तेलंगणातून अशीच एक घटना समोर आली आहे. हैदराबादच्या नंदीगामामध्ये एका ४० वर्षीय पुरूषाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी लग्न केले. तो पुरूष शाळेत शिक्षक आहे आणि मुलगी आठवीत शिकत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी लग्न लावणाऱ्या पुजाऱ्याविरोधात आणि त्या ४० वर्षीय शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लग्नाची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी ४० वर्षीय शिक्षक, मुलगी आणि पंडित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लग्नाचा फोटो व्हायरल
पोलिसांना सादर केलेल्या फोटोंमध्ये आठवी इयत्तेत शिकणारी विद्यार्थीनी ४० वर्षांच्या पुरूषासमोर हार घालून उभी असल्याचे दिसत आहे. त्यांच्या दोन्ही बाजूला एक महिला आहे, ज्यावर त्या पुरूषाची पत्नी असल्याचा संशय आहे आणि एक पुजारी आहे.
कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशनच्या अहवालानुसार, बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ सारखे कायदे असूनही, काही राज्यांमध्ये अजूनही ही प्रथा प्रचलित आहे.