Social Viral: बंगळुरुत एका ४० वर्षीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. कर्मचाऱ्याने आजारी असल्याने सुट्टीसाठी मॅनेजरला मेसेज केला होता. मात्र मेसेज केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांतच त्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मॅनेजरने सोशल मीडियावर पोस्ट करत हा सगळा धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. कोणतेही व्यसन नसताना कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
बंगळुरूमधील ४० वर्षीय शंकर यांनी त्यांच्या मॅनेजरला आजारी असल्याने रजा मागितल्यानंतर काही मिनिटांतच अचानक त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शंकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे टीम लीडर के.व्ही. अय्यर यांना जबर धक्का बसला. के.व्ही. अय्यर यांनी एक्स पोस्टमध्ये हा सगळा प्रकार सांगितला. शंकर यांनी त्यांना मेसेज केला होता की तो पाठदुखीमुळे ऑफिसला येऊ शकणार नाही. मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
अय्यर यांनी म्हटलं की, "सकाळी ८:३७ वाजता, शंकर यांनी मला मेसेज केला की सर, मला खूप पाठदुखी होत आहे, त्यामुळे मी आज येऊ शकणार नाही. कृपया मला सुट्टी द्या. मला ते सामान्य वाटले आणि मी, 'ठीक आहे, विश्रांती घ्या' असं उत्तर दिलं. काही तासांनंतर, अय्यर यांना शंकरच्या मृत्यूची माहिती देणारा फोन आला. सुरुवातीला, मला विश्वासच बसत नव्हता. मी दुसऱ्या सहकाऱ्याला फोन करून खात्री केली आणि त्याच्या घरी गेलो. मी पोहोचलो तेव्हा तो गेला होता."
"शंकर हा तंदुरुस्त, धूम्रपान न करणारा, मद्यपान न करणारा, विवाहित आणि एका मुलाचा पिता म्हणून होता. त्याने सहा वर्षे माझ्या टीममध्ये काम केले होते. त्याला हृदयविकाराचा झटका आला. अविश्वसनीय म्हणजे त्याने मला सकाळी ८:३७ वाजता मेसेज केला आणि ८:४७ वाजता त्याचे निधन झाले. त्याच्या शेवटच्या श्वासाच्या फक्त १० मिनिटे आधी त्याने मला मेसेज केला होता. मी पूर्णपणे हादरलो आहे," असंही अय्यर यांनी म्हटलं.
दरम्यान, अय्यर यांनी त्यांच्या पोस्टचा शेवटी लोकांशी वागण्याबाबत भाष्य केलं. "जीवन अनपेक्षित आहे. तुमच्या सभोवतालच्या लोकांशी दयाळूपणे वागा आणि आनंदाने जगा, कारण पुढचा क्षण काय घेऊन येईल हे तुम्हाला कधीच कळत नाही," असं अय्यर म्हणाले.