मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरजवळील राष्ट्रीय महामार्गावर रस्ता सुरक्षेबाबत निष्काळजीपणाचा एक भयंकर प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर एका १० वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो महामार्गावर चक्क ट्रक चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला असून सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसून येतं की मुलगा कोणत्याही भीतीशिवाय एकटाच ट्रक चालवत आहे. मात्र यामुळे लोकांचा जीव धोक्यात आला आहे. या घटनेतील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलाला त्याच्या वडिलांनीच ट्रक चालविण्यास प्रवृत्त केलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाचं नाव इम्रान खान आहे. इम्रानने त्याच्याच अल्पवयीन मुलाला महामार्गावर ट्रक चालवायला लावला. ट्रकचा आकार आणि महामार्गाचा वेग यावरून हा निष्काळजीपणा किती गंभीर होता हे दिसून येतं.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, लोक सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत आहेत. प्रशासनाने लोकांना अशा प्रकरणांची त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून वेळीच कारवाई करता येईल.