रत्नागिरी : सदोष गुणपद्धतीमुळे आयटीआय म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या निकालात घोळ झाल्याचे निदर्शनास येत आहे. रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील केवळ अकरा विद्यार्थी पास झाले आहेत.रत्नागिरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १०९४ विद्यार्थी आणि १५० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. येथे विविध प्रकारचे २५ अभ्यासक्रम शिकवण्यात येतात. परंतु नकारात्मक गुणपध्दतीमुळे बहुतांश ट्रेडचा शून्य टक्के लागला आहे. सेमिस्टर पॅर्टनच्या परीक्षेच्या निकालाची राज्यभर हिच स्थिती असल्याने आयटीआयमधील मुलांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. रत्नागिरी आयटीआय संस्थेने जाहीर केलेला निकाल मुलांकडून परत मागून पुनर्तपासणीसाठी पाठविला आहे. याप्रकरणी आयटीआय सहसंचालकांनी निकाल पडताळणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात त्रिसदसीय समिती नेमली आहे. राज्यातल्या आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सेमिस्टरची महत्त्वपूर्ण परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा उजाडला. सदोष गुण पद्धतीमुळे निकालावर परिणाम झाला आहे. निकाल कमी लागल्याने विद्यार्थ्यांसह सर्व संस्था हवालदिल झाल्या आहेत. (प्रतिनिधी)राज्यात सेमिस्टरची परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी आहेत. चुकीच्या गुणपद्धतीने या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना आता पुढील वर्षात प्रवेश घेण्यासाठी डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. मात्र, अजून या सदोष निकालप्रकरणी काय निर्णय घ्यायचा, याची निश्चिती होत नसल्याने हजारो विद्यार्थी पुढच्या वर्षी प्रवेश घेऊ शकणार नाहीत. - ए. आर. साबळे,उपप्राचार्य, आयटीआय, रत्नागिरी.
यंदा आयटीआयचे केवळ अकरा विद्यार्थी उत्तीर्ण
By admin | Updated: December 2, 2014 23:31 IST