अनंत जाधव - सावंतवाडी =सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राहणार असून, प्रत्येक पक्षाने उमेदवारही तगडे देण्याचे ठरविले आहे. शिवसेना - भाजप महायुतीकडून दीपक केसरकर मैदानात असतील, तर मनसेकडून परशुराम उपरकर निश्चित असले तरी आघाडीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. त्यातच नारायण राणे यांचे कट्टर समर्थक राजन तेली यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत तिकिटावर दावेदारी केल्याने काँग्रेसच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा गेल्या काही महिन्यात चांगलाच चर्चेत आला आहे. विशेषत: लोकसभा निवडणुकीत दीपक केसरकर यांनी आघाडीविरोधात घेतलेली भूमिका महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारी ठरल्याने सर्वांचेच लक्ष सावंतवाडी विधानसभा निवडणुकीकडे लागून राहिले आहे. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले अशा तीन तालुक्यात विस्तारलेला हा मतदारसंघ इतर मतदारसंघांच्या तुलनेत मोठा आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर हे राष्ट्रवादी काँॅग्रेसच्या तिकिटावर निवडून आले असले, तरी त्यांच्या मागे उद्योगमंत्री नारायण राणे यांची ताकद होती. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनीही प्रचंड मेहनत घेत केसरकर यांच्या विजयात हातभार लावला होता. पण, आता पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीत घडलेल्या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा देत थेट शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे पूर्वीची राजकीय गणिते आता बदलण्याचीच जास्त शक्यता आहे. त्यातही नारायण राणे यांच्याविरोधी बंड पुकारून केसरकर शिवसेनेत प्रवेशकर्ते झाल्याने आता राजकारण कोणाच्या बाजूला झुकते, याकडे लक्ष लागले आहे.आघाडीचा उमेदवार अद्याप ठरला नाही. नुकतेच काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले राजन तेली यांच्या उमेदवारीला काँग्रेसचा प्रचंड विरोध आहे. मागील काही वर्षात वरिष्ठ पातळीवर सूत्र ठरले आहे की, काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता घेऊ नये. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचा नेता घेऊ नये. सध्या हा फॉर्म्युला राष्ट्रवादी काँग्रेसने तोडला असल्याचा आरोप काँग्रेसने सुरू केला असून, सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून राजन तेलींच्या उमेदवारीला काँग्रेसने विरोध सुरू केला आहे.त्यामुळे आघाडीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सावंतवाडी, वेंगुर्ले या पंचायत समित्यांवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेच्या मोठ्या प्रमाणात जागाही काँग्रेसकडेच आहेत. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसची असलेली ताकद ओळखता काँग्रेसला विश्वासात घेऊनच उमेदवारी देण्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसला पर्याय नाही. एवढे होऊनही राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा उमेदवारीची माळ तेलींच्या गळ्यात घातली, तर काँग्रेस या मतदारसंघात बंडखोरी करेल, यात शंका नाही.सावंतवाडी मतदारसंघात मनसेच्यावतीने माजी आमदार परशुराम उपरकर यांना रिंगणात उतरविले आहे. उपरकर यांनीही जोरदार प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे. एकूणच या मतदारसंघाचा सध्या तरी अंदाज बांधणे कठीण आहे. आघाडीचा उमेदवार कोण असणार, तसेच त्याला काँग्रेसची कशी साथ मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. एकूण झालेले मतदान १ लाख ३१ हजार ३७९.
केसरकर यांना तगडे आव्हान कोण देणार ?
By admin | Updated: September 17, 2014 22:23 IST