वैभव साळकरदोडामार्ग : मांगेलीच्या वर्षा पर्यटनाचा यंदाचा हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच फणसवाडी धबधबा परिसरात वटपौर्णिमेसाठी फणस आणण्यासाठी गेलेल्या इसमावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. विष्णू लाडू गवस (वय ५०) असे त्यांचे नाव असून, त्यांच्यावर बांबुळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, मांगेली गाव सह्याद्री डोंगररांगांच्या कुशीत वसला आहे. त्यामुळे जंगली श्वापदांचा इथे कायमच वावर असतो. मात्र, गेल्या वर्षभरापूर्वी तळेवाडी येथील एका शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याचा अपवाद वगळता इतर कोणत्याही जंगली प्राण्याने हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार घडला नव्हता. मात्र, वर्षभरानंतर पुन्हा एकदा अस्वलाने हल्ला करून स्थानिक नागरिकाला जखमी करण्याची घटना मंगळवारी घडली. विष्णू गवस हे फणसवाडी येथील धबधब्याच्या परिसरात वटपौर्णिमेसाठी फणस आणण्याकरिता गेले होते. यावेळी त्या फणसाच्या झाडाखाली असलेले अस्वल व त्याची पिल्ले त्यांना दिसली नाहीत.अस्वलाला आपल्या बाजूने येत असलेले गवस दिसताच त्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. यात अस्वलाने त्यांच्या मांडीला व गुप्तांगाला नखांनी ओरबाडल्याने गंभीर दुखापत झाली. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी गवस यांनी आरडाओरडा केला असता अस्वलाने तेथून जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र तोपर्यंत गवस रक्तबंबाळ झाले होते. त्याच अवस्थेत त्यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात स्थानिकांनी उपचारासाठी आणले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे पाठविण्यात आले आहे.
वर्षभरातील दुसरी घटनागेल्या वर्षभरात अस्वलांचा मांगेली परिसरात वावर वाढला आहे. साधारणतः वर्षभरापूर्वी तळेवाडी येथील सुरेश गवस यांच्यावर अस्वलाने हल्ला करून त्यांना जायबंदी केले होते. त्यानंतर दुसरा हल्ला मंगळवारी फणसवाडी येथील विष्णू गवस यांच्यावर झाला. त्यामुळे मांगेलीत खळबळ उडाली आहे
मांगेली दहशतीखाली ?गेल्या वर्षभरात मांगेलीतील तळेवाडी व तिला लागून असलेल्या फणसवाडी येथील नागरिकावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी करण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना वर्षभराच्या फरकाने घडल्या. मंगळवारी झालेला हल्ला तर भर वस्तीशेजारी आणि तळेवाडीत जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून काही अंतरावर झाला. त्यामुळे अस्वलाची कमालीची दहशत लोकांमध्ये पसरली आहे. तळेवाडीत जाणारी शाळकरी मुले याच मार्गाने जातात. शिवाय पर्यटन हंगामही आता तोंडावर आहे. त्यामुळे या हल्लेखोर अस्वलाचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे