लोकमत न्यूज नेटवर्क, मालवण (जि. सिंधुदुर्ग) : शिवपुतळा दुर्घटनेनंतर महायुती सरकारने विक्रमी वेळेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला. या पुतळ्याबरोबरच छत्रपतींच्या कार्याचा अनुभव यावा, यासाठी परिसराचा भागही शिवसृष्टी म्हणून विकसित केला जाणार आहे. यासाठी जेवढी जागा उपलब्ध होईल, त्यानुसार त्याचे डिझाइन बनवून हे कामही आम्ही मार्गी लावू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मालवण येथे दिली.
किल्ले राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपतींचा जवळपास ९१ फुटांचा हा पुतळा आहे. देशातील सर्वांत उंच पुतळा म्हणून या पुतळ्याकडे पाहता येईल. किमान १०० वर्षे हा पुतळा कुठल्याही प्रकारच्या वातावरणात टिकेल, अशी रचना आहे. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हा पुतळा आदराचे एक स्मारक बनेल.
कोकण महायुती सरकारच्या अजेंड्यावर
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महायुती सरकारने कोकणाला झुकते माप देण्याचे काम मागील अडीच ते तीन वर्षांत केले आहे आणि यापुढेही आमच्या सरकारची भूमिका हीच असेल. पर्यटनाच्या दृष्टीने जेवढा अधिकाधिक विकास करता येईल, तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
९१ फूट उंचीचा पुतळा
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली विक्रमी वेळेत छत्रपतींचा हा पुतळा उभारण्यात आला आहे.कोकणात वेगवेगळ्या प्रकारची जी वादळे येतात, त्यांच्या परिणामांचा अभ्यास करून यापेक्षाही मोठे वादळ आले तरी हा पुतळा त्याठिकाणी उभा राहू शकेल, अशा प्रकारची रचना करण्यात आली. जवळपास ९१ फुटांचा हा पुतळा आहे. चबुतरा हा १० फूट उंचीचा आहे.