वैभववाडी : रात्री अपरात्री शेजार्यांच्या घरी येणे जाणे असल्याच्या संशयावरून सोनाळी गावठणवाडीतील युवकावर त्याच गावातील दोघा भावांनी पोलीस ठाण्यानजीक प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यानंतर सोनाळी सरपंचासह त्याच्या भावाने हल्लेखोराच्या भावाला अडवून मारहाण करत संपवून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी हल्लेखोरांना अटक केली असून सरपंच व त्याच्या भावाविरूद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. या दोन्ही घटना दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडल्या. पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार सोनाळी गावठणवाडीतील कमलेश केशव शेलार (वय २८) याचे वाडीतील लोकांच्या घरी रात्री अपरात्री जाणेयेणे असते. त्यामुळे त्याच्यावर संशय होता. या संशयावरूनच सचिन सदाशिव कदम व अनिल सदाशिव कदम यांनी कमलेश हा केशकर्तनालयात गेला असताना त्याला बोलावून घेऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. सचिन कदमने कमलेशच्या डोक्यावर दगडाने मारहाण केली तर अनिलने हाताच्या ठोशाने बेदम मारहाण केली. कदम बंधूंच्या हल्ल्यात कमलेशच्या डोक्याला तीन ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी सचिन व अनिल कदम यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर कमलेशचे नातेवाईक असलेले सोनाळी सरपंच प्रकाश मारुती शेलार व त्यांचा भाऊ सहदेव यांनी हल्लेखोरांचा भाऊ विलास सदाशिव कदम याला शेतातून घरी जात असताना रस्त्यात अडवून त्याला बेदम मारहाण केली. तसेच कदम बंधूंना संपवून टाकेन अशी धमकी देत विलासच्या दुचाकीचे नुकसान केले. त्यामुळे विलासच्या तक्रारीवरून सरपंच त्यांच्या भावाविरूद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)
युवकावर हल्ला वैभववाडी-सोनाळीतील घटना : हल्लेखोरांना अटक; सरपंचावर गुन्हा
By admin | Updated: May 10, 2014 23:58 IST