सावंतवाडी : डेगवे येथील शासकीय जंगलात खैरतोड केल्याप्रकरणी तळवडे येथील महेश मोहन मालवणकर (वय २८) व दौलत अशोक गोडकर (२०, दोघे रा. तळवडे) या दोघा युवकांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई ग्रामस्थांच्या मदतीने काल, गुरूवारी रात्रीच्या सुमारास सावंतवाडीवनविभागाने केली. यावेळी कटर मशीन, बॅटरी, दुचाकी आणि तोडलेले लाकुड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. डेगवे-तांबोळी रस्त्यावरील शासकीय जंगलात रात्रीच्या वेळी खैर झाडे तोडण्यात येत असल्याचा आवाज तेथील स्थानिक ग्रामस्थ शंकर देसाई यांना आला. यावेळी त्यांनी गावातील अन्य ग्रामस्थांना व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. यावेळी सर्वांनी त्या ठिकाणी जावून त्या दोघांना मुद्देमालासह सह ताब्यात घेत त्याना धरून ठेवले.त्यानंतर वनविभागाचे पथक तेथे दाखल झाले आणि या युवकाना ताब्यात घेण्यात आले तसेच सावंतवाडी वनविभाच्याा माध्यमातून ग्रामस्थांकडून जी जागरुकता दाखवली त्याबद्दल आभार मानून बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी डेगवे सरपंच राजन देसाई, माजी सरपंच मधुकर देसाई, पोलिस पाटील अरविंद देसाई, राजेश देसाई, अजिंक्य घोडके आदी उपस्थित होते. ही कारवाई सिंधुदुर्ग चे उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर, वनपाल प्रमोद सावंत, पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक संतोष मोरे, दत्तात्रय शिंदे, अप्पासो राठोड, सागर भोजने, संग्राम पाटील आदींनी केली आहे.
Sindhudurg: खैरतोड करणारे दोघे वनविभागाच्या ताब्यात, डेगवे येथील जंगलात कारवाई
By अनंत खं.जाधव | Updated: August 9, 2024 16:19 IST