मालवण : मालवण किनाऱ्यावरील समुद्री वाळू बोटीमधून नेणाऱ्या तामिळनाडू येथील मासेमारी करणाऱ्या बोटीवर महसूल, पोलिस आणि मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई करुन ही बोट ताब्यात घेतली आहे. या बोटीवर तांडेलसह चौदा कामगार आढळले. या बोटीमध्ये २५० वाळूची पोती आढळली. प्रत्येक पोत्यामध्ये पाच ते सहा किलो वाळू आढळली आहे. स्थानिक मच्छिमारांनी दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. बोट मालवण जेटीवर आणण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नौकेवरील डिझेल संपल्याने नौका मालवण किनारपट्टीवर आणण्यात आली होती. तसेच वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही दिवस नौका मालवण बंदरातच ठेवण्यात येणार होती असे समजते . मात्र, आश्रयासाठी जर बोट आणण्यात आली होती, तर याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाला का देण्यात आली नाही? याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.
२५० गोण्या वाळू सापडलीतहसीलदार वर्षा झालटे यांनी दिलेल्या आदेशाने महसूल विभागाचे मंडळ अधिकारी पिटर लोबो, तलाठी गौरव दळवी यांनी थेट मालवण किल्ले सिंधुदुर्ग परिसरात उभ्या असलेल्या तामिळनाडू येथील मासेमारी नौकेवर जात कारवाई केली . यावेळी पोलिस विभाग आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (आयएनडी केएल ०४ एमएम ४०३१) नौकेचे नाव जननी असे आहे. या नौकेवर २५० गोण्या वाळू भरलेली सापडून आली आहे. बोट आता मत्स्य व्यवसाय विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.
मासेमारीसाठी वाळूचा वापर कशासाठी?तामीळनाडू येथील मासेमारी बोट मालवण किल्ले परिसरात उभी होती. त्याच्यावरील खलाशी मालवण किनाऱ्यावर छोट्या होडीच्या सहाय्याने येऊन सिमेंटच्या गोण्यांमध्ये माती भरून घेऊन जात होते. तामिळनाडूची मासेमारी नौका मालवण बंदरात आलीच का होती? बोटीमध्ये वाळू भरून का नेण्यात येत होती? मासेमारीसाठी वाळूचा वापर कशा पद्धतीने केला जात आहे का? याबाबत चौकशी होण्याची शक्यता आहे.