कणकवली : देवगड एसटी डेपोतील एक कर्मचारी महिलांसोबत गैरवर्तणूक करताना आढळून आला आहे. त्याच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. बाहेरील जिल्ह्यातून सिंधुदुर्गात येवून महिलांवर अत्याचार करण्याचे प्रकार युवासेना खपवून घेणार नाही असा इशारा शिंदेसेना युवासेनेचे जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. याबाबतचे निवेदन एसटीचे कणकवली विभाग नियंत्रक कार्यालय व देवगड डेपोतील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यावेळी जिल्हासचिव निलेश मेस्त्री, देवगड नगरसेविका तन्वी चांदोस्कर, मानस चिंदरकर, संकेत वरक, विश्राम सावंत आदी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, देवगड एसटी डेपो मधील एक कर्मचारी हा एसटी डेपोच्या आवारातील तरुणींची तसेच एसटीतून प्रवास करणाऱ्या तरुणींचे नंबर मागून छेडछाड करताना आढळून आला आहे. तसेच त्याने एका मुलीला दीड वर्ष धमकी देऊन चुकीच्या पद्धतीने एका घरामध्ये डांबून ठेवले होते. ही गोष्ट आम्हाला त्यांच्या नातेवाईक व आई-वडिलांकडून कळवण्यात आली होती. आम्ही या गोष्टीची शहानिशा करून त्या मुलीची सुटका केलेली आहे. त्यामुळे संबंधित एसटी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा एसटी डेपो बाहेर मुलीच्या नातेवाईकांना घेऊन तसेच सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला जबाबदार एसटी महामंडळ असेल, असेही या निवेदनात म्हटले आहे.
महिलांसोबत गैरवर्तणूक करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यावर कारवाई करा, अन्यथा..; शिंदेसेना युवासेनेने दिला इशारा
By सुधीर राणे | Updated: April 4, 2025 12:36 IST