रत्नागिरी : नव्या शैक्षणिक वर्षात संचमान्यता देण्यात आल्याने प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त झाले. राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात गुरुवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले़ यामध्ये शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात संचमान्यता देण्यात आल्याने प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरले आहेत़ त्यांच्या समावेशनाची प्रक्रिया चुकीची आहे़ शिक्षणसेवकांना अद्यापपर्यंत कायद्याने संरक्षण मिळालेले नाही़ संचमान्यता रद्द करावी, शिक्षक, शिक्षणसेवकांना संरक्षण मिळावे, अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन सुरु राहावे, या मागण्यांसाठी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष रमेश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ सकाळपासून शिक्षकांनी जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार रोखून धरले होते़ त्यामुळे परिषद भवनाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती़ मात्र, पोलिसांच्या विनंतीवरुन आंदोलन स्थगित करुन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़या आंदोलनामध्ये कार्याध्यक्ष दिलीप शिंदे, राधाकृष्ण जोशी, आनंद त्रिपाठी, राजन नाईक, अरुण कुराडे, रुपाजी कांबळे, विलास डंबे, उत्तम कांबळे, राहुल सप्रे, महेश साळगांवकर, महेंद्र कुवळेकर यांच्यासह अन्य शिक्षक व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते़ (शहर वार्ताहर)शिक्षक परिषद ही संघटना भाजप प्रणित असताना देखील शासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात शिक्षकांच्या हक्कासाठी ठिय्या आंदोलन, रास्ता रोको आदि माध्यमातून आंदोलने केली़ मात्र, शिक्षकांच्या इतर संघटनांनी पाठींबा दिलेला नाही, हे दुर्दैव आहे़ - रमेश जाधव, जिल्हाध्यक्ष, शिक्षक परिषद़
शिक्षक परिषदेचा रस्ता रोको आंदोलन
By admin | Updated: November 28, 2014 00:07 IST