वैभव साळकरदोडामार्ग : गेल्या वर्षभरापासून तिलारी घाटातून बंद असलेली एसटी महामंडळाची बससेवा पुन्हा सुरू होणार आहे. सर्वांची लाडकी लालपरी उद्या बुधवार (दि. २)पासून नव्याने धावणार आहे.तिलारी घाट सुरक्षेच्या दृष्टीने वाहतुकीस योग्य नसल्याचे कारण देत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तो गत पावसाळ्यात अवजड वाहतुकीस बंद केला होता. मात्र, या निर्णयाचा बागुलबुवा करून एसटी महामंडळाने घाटातील बस वाहतूकही अनिश्चित कालावधीसाठी बंद केली होती. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. परिणामी ही वाहतूक पूर्ववत व्हावी, यासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी अनेकदा आंदोलने केली आणि पाठपुरावाही केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. उद्या बुधवारपासून घाटातून एसटी बस वाहतूक सुरू होणार आहे. तसे पत्र एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागाकडून सर्व आगारप्रमुखांना देण्यात आले आहे.
Sindhudurg: तिलारी घाटातून उद्यापासून धावणार पुन्हा लालपरी, गेल्या वर्षभरापासून बंद होती वाहतूक
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 1, 2025 19:11 IST