सिंधुदुर्ग : समीर अभ्यंकर यांच्या मैफिलिचा रसिकाना सांगितिक नजराना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:30 PM2018-10-24T12:30:37+5:302018-10-24T12:38:48+5:30

अतिशय सुरेल व भरीव आवाज, सुस्पष्ट राग मांडणी, अप्रतिम लयकारी आणि रसिकांशी उत्तम संवाद साधत मैफिल रंगवायची हातोटी अशा वैशिष्ट्यपूर्ण सुंदर गायकीचा पुरेपूर आनंद आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे उपस्थित रसिकांनी घेतला. निमित्त होते ते मुंबईतील नामवंत शास्त्रीय गायक समीर अभ्यंकर यांच्या संगीत मैफिलीचे. या मैफिलीचा सुंदर नजराना रसिकाना गंधर्व फाउंडेशन मुळे मिळाला.

Sindhudurg: Gift to Rasikana Prasarik, Samir Abhyankar's music concert | सिंधुदुर्ग : समीर अभ्यंकर यांच्या मैफिलिचा रसिकाना सांगितिक नजराना

 आशिये येथे गंधर्व संगीत सभेत समीर अभ्यंकर यानी सुमधुर गीते सादर केली.

ठळक मुद्देआशिये मठ येथे रसिकाना सांगितिक नजराण्याची भेटसमीर अभ्यंकर यांच्या संगीत मैफिलिचे निमित्त

कणकवली : अतिशय सुरेल व भरीव आवाज, सुस्पष्ट राग मांडणी, अप्रतिम लयकारी आणि रसिकांशी उत्तम संवाद साधत मैफिल रंगवायची हातोटी अशा वैशिष्ट्यपूर्ण सुंदर गायकीचा पुरेपूर आनंद आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे उपस्थित रसिकांनी घेतला. निमित्त होते ते मुंबईतील नामवंत शास्त्रीय गायक समीर अभ्यंकर यांच्या संगीत मैफिलीचे. या मैफिलीचा सुंदर नजराना रसिकाना गंधर्व फाउंडेशन मुळे मिळाला.

येथील गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने 22 व्या गंधर्व शास्त्रीय संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत समीर अभ्यंकर ह्यांचे बहारदार गायन झाले. त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात' पूर्वी 'रागाने केली. तिलवाडा तालात त्यांनी पारंपारिक विलंबित ख्याल 'पिहरवा के बासे' गायला सुरुवात केला आणि तो उत्तरोत्तर रंगत गेला.

पुढे त्यांनी ह्या रागातील 'मथुर न जाओ मोरा कान्हा' हि द्रुत तीनतालातील बंदिश पण फार भावपूर्णतेने नटवली. त्यानंतर समीर अभ्यंकर ह्यांनी खमाज अंगाचा राग 'धनाश्री' पेश केला. अप्रचलित व अनवट असा हा राग असूनही समीर अभ्यंकर यांनी तो लीलया पेलला. ह्या रागात त्यांनी 'थे म्हारो राजेंद्र' हा बडा ख्याल विलंबित एकतालात तर 'शुभ घडी शुभ दिन' हा छोटा ख्याल द्रुत तीनतालात सादर केला व रसिकांची वाहवा मिळवली.



उत्तरोत्तर रंगत गेलेल्या ह्या मैफिलीत पुढे समीर अभ्यंकरांनी 'सुर सुख खनी तु विमला' हे संगीत विद्याहरण नाटकातील पद सादर केले. किरवाणी रागातील ह्या नाट्यगीताला श्रोत्यांची विशेष दाद मिळाली. कार्यक्रमाचे समापन समीरजींनी 'दत्त मनोहर दिसतसे उभा' हि बेळगांवच्या पू.काणे महाराजांची रचना गाऊन केली.

ह्या रचनेला समीर अभ्यंकर ह्यांचे आजोबा व गुरु पं. एस. के. अभ्यंकर ह्यांनी चाल दिलेली आहे. एकमुखी दत्तावर असलेली हि सुंदर रचना समीर अभ्यंकर यानी खूप भक्तीभावाने आळवली. सुमारे दीडतास चालू असलेल्या ह्या मैफिलीने सर्व रसिक श्रोते भारावून गेले होते.

समीर अभ्यंकर यांना प्रथमेश शहाणे (तबला) व वरद सोहोनी यांनी (संवादिनी) वर अप्रतिम साथसंगत केली. दोघांनी समीर अभ्यंकर ह्यांना अतिशय पूरक साथ करून कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढवली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसाद घाणेकर यांनी समीर अभ्यंकर ह्यांची खूप सुंदर मुलाखत घेतली. सर्व प्रश्नांची त्यांनी अतिशय मुद्देसूद व सुस्पष्टतेने उत्तरे दिली. त्यात रसिकांनी शास्त्रीय संगीताचा अधिक चांगला रसास्वाद घेण्यासाठी काय करायला हवे असा प्रश्न केला असता सर्वप्रथम गंधर्व संगीत सभेचे कौतुक केले व 'आपल्यासारख्या संस्था अशाप्रकारे शास्त्रीय संगीताचे दर्जेदार कार्यक्रम करून एक उत्तम श्रोतृगण तयार करण्यास खूप मोठे योगदान देत आहेत', असे सांगितले.

'शास्त्रीय संगीतातील बारकावे जाणून घेण्यासाठी श्रोते रीतसर शास्त्रीय संगीत शिकू शकतातच .परंतु , वरचेवर उत्कृष्ट दर्जाचे शास्त्रीय संगीत ऐकूनही संगीत साक्षरता साधली जाऊ शकते. मात्र , ह्याचा उपयोग अति चिकित्सा करण्यासाठी न होता अभिजात शास्त्रीय संगीताचा रसास्वाद अधिक चांगल्या तऱ्हेने घेण्यासाठी व्हायला हवा. रागसंगीतातील बारकावे रसिकांना अधिक चांगले समजावेत ह्यासाठी भविष्यात सखोल माहिती देणाऱ्या प्रायोगिक संगीत कार्यशाळा अधिक प्रमाणात व्हायला हव्यात अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

22 वी गंधर्व सभा यशस्वी होण्यासाठी लिव्ह इन म्युझिक फ्रेंड सर्कलचे सर्व सदस्य, तसेच गंधर्व फॉउंडेशनचे अभय खडपकर, श्याम सावंत, संतोष सुतार, सागर महाडीक, किशोर सोगम, मनोज मेस्त्री, दामोदर खानोलकर, ध्वनी संयोजक बाबू गुरव, दत्त मंदिर आशिये कमिटीचे विलास खानोलकर व राजू करंबेळकर यांनी विशेष मेहनत घेतली.

25 नोव्हेंबर रोजी 23 वी गंधर्व सभा !

23 वी गंधर्व सभा 25 नोव्हेंबर रोजी होणार असून गझलसम्राट भीमराव पांचाळे  यांची कन्या व गायक रमाकांत गायकवाड यांची पत्नी भाग्यश्री पांचाळे  - गायकवाड यांचे शास्त्रोक्त गायन व गझल गायन होणार आहे. यासाठी रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गंधर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय खडपकर यांनी यावेळी केले.
 

Web Title: Sindhudurg: Gift to Rasikana Prasarik, Samir Abhyankar's music concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.