बांदा : मडुरा, पाडलोस परिसरात गव्यांकडून शेती, बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाला याची कल्पना देऊनही पंचनामा करण्यात न आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.मडुरा परिसरात आतापर्यंत मगरींची दहशत होती. आता मात्र गव्यांकडूनही शेतकऱ्यांनी मेहनतीने फुलविलेल्या बागायती रातोरात नष्ट करण्यात येत असल्याने शेतकरी आर्थिक मेटाकुटीला आले आहेत.मडुरा परबवाडी, चौवडीवाडी, शेर्लेकरवाडी तसेच पाडलोस भाकरवाडी, केणीवाडा, न्हावेली रेवटेवाडी आदी भागात गव्यांनी वायंगणी शेती, मिरची बागा, चवळी, फजाव, मका आदी पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. याची शेतकऱ्यांनी वनविभागाला कल्पना दिली आहे. तसेच नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा वनखात्याने वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.रात्रीच्या वेळी गव्यांकडून शेतीचे नुकसान करण्यात येत आहे. मात्र काहीवेळा हे गवे भर दिवसादेखील शेतात येऊन शेती फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितालादेखील धोका निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांनी नुकसानीची कल्पना वनविभागाला दिली होती. मात्र अद्यापपर्यंत नुकसानीचा पंचनामा करण्यात आलेला नाही. एक आठवडा उलटूनही वनकर्मचारी पंचनाम्यासाठी आले नसल्याचे शेतकरी राजन पंडित यांनी सांगितले.९0 हजारांचे नुकसानमडुरा परबवाडी व चौवडीवाडी येथील राधाबाई वामन परब (चवळी, फजाव), प्रकाश विष्णू मोरजकर (मिरची), राजन यशवंत पंडित (मिरची), प्रकाश यशवंत पंडित (मिरची), राजश्री वामन मोरजकर (मिरची), दीपक सदाशिव घाडी (मिरची), ज्ञानेश पांडुुरंग परब (मिरची) या शेतकऱ्यांचे सुमारे ८0 ते ९0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर पाडलोस केणीवाडा येथील राजन तुकाराम नाईक (भातशेती), प्रशांत अंकुश नाईक (चवळी) यांचेही नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्ग : गव्यांकडून शेती, बागायतीचे नुकसान, मडुरा, पाडलोसमधील शेतकरी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 15:37 IST
मडुरा, पाडलोस परिसरात गव्यांकडून शेती, बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाला याची कल्पना देऊनही पंचनामा करण्यात न आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग : गव्यांकडून शेती, बागायतीचे नुकसान, मडुरा, पाडलोसमधील शेतकरी हैराण
ठळक मुद्देगव्यांकडून शेती, बागायतीचे नुकसान, मडुरा, पाडलोसमधील शेतकरी हैराणसिंधुदुर्ग वनविभागाला कल्पना देऊनही पंचनामा न केल्याने नाराजी