खेड : खेड नगरपालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही, शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढवेल, याकरिता कोणाच्या कुबड्यांची आम्हाला गरज नाही, अशी स्पष्टोक्ती शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी दिली. खेड येथील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली़खेड येथील सभापती निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी त्यांच्यासमवेत खेड पंचायत समितीचे सभापती चंद्रकांत कदम, तालुकाप्रमुख राजा बेलोसे, उपतालुकाप्रमुख शांताराम म्हैसकर, चंद्रकांत सुतार तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्यावतीने आयोजित शिबिराची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी नगरपालिकेतील निवडणुकीसंदर्भात भूमिका स्पष्ट केली. येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करण्यात येत असून, कोणत्याही परिस्थितीत आम्ही खेड नगरपालिकेवर भगवा फडकवणारच, असा निर्धार सचिन कदम यांनी जाहीर केला़ याबाबत पत्रकारांनी सेना आणि मनसे युतीबाबत छेडले असता अशा युतीची आम्हाला आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले़ नगरपालिका निवडणुकीत मनसेशी शिवसेना युती करणार नसल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला. खेड नगरपालिकेच्या निवडणुकीत कोणाशीही युती न करण्याचा निर्णय जाहीर केल्याने त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपलाही नाकारले आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील घरोबा सर्वज्ञात असला तरी शिवसेनेने त्यांच्याशी फारकत घेण्यास सुरुवात केली आहे. खेडमध्ये शिवसेनेपाठोपाठ मनसेची ताकद चांगली असल्याने या निवडणुकीत त्यांच्याशी युती करण्याची शक्यता होती. मात्र, त्याही युतीला नकार देत शिवसेनेने स्वबळाचा झेंडा फडकावला आहे. याबाबत वरिष्ठ कोणता निर्णय घेतात, यावरच पुढील गणित ठरणार असल्याचे दिसत आहे. शिवसेनेकडून उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या भागात रामदास कदम यांना मानणारा आणि अनंत गीते यांना मानणारा गट कार्यरत आहे. त्यामुळे अंतर्गत वाद उफाळण्याची चिन्हे अधिक आहे. पक्षांतर्गत कुरबुरीचा फटका नगरपालिकेच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उमेदवारांची निवड करताना पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)जिल्हाप्रमुखांनी दिला स्वबळाचा नारा.नगरपालिकेच्या निवडणुकीत रंगणार कलगी - तुरा.स्वतंत्र लढल्यास निवडणूक रंगतदार होणार.शिवसेनेने मनसेबरोबर युती करण्यास नकार दिला.स्थानिक पातळीवरील निर्णय कितपत फायदेशीर ?खेड नगरपालिकेवर भगवा फडकविण्याचा केला निर्धार.कोण मारणार बाजी ?
शिवसेना - भाजप युतीची शक्यता धूसर
By admin | Updated: October 5, 2015 00:06 IST