मालवण : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली येथे साकारलेले स्कुबा डायव्हिंग सेंटर आंतरराष्ट्रीय मानांकनानुसारच आहे. एमटीडीसीने हे स्कुबा डायव्हिंग सेंटर उभारताना कोणत्याही त्रुटी शिल्लक ठेवल्या नाहीत. तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटरला ‘पॅडी’ची मान्यता मिळण्यास काहीच हरकत नाही. तसा अहवाल पॅडीला सादर करण्यात येणार असल्याचे पॅडी एशिया पॅसेफिकचे विभागीय व्यवस्थापक अॅन्ड्रेस अवूर यांनी सांगितले.पॅडी या आंतरराष्ट्रीय संस्थेशी संलग्न राहून एमटीडीसीने तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग प्रकल्प हाती घेतला आहे. या संस्थेच्या अटी, शर्थी व मानांकनानुसार स्कुबा डायव्हिंग प्रकल्प उभारण्यात आला आहे. याची तपासणी करण्यासाठी बुधवारी पॅडी एशिया पॅसेफिकच्या अॅन्ड्रेस अवूर यांनी भेट दिली.यावेळी अॅन्ड्रेस अवूर म्हणाले, जागतिक पातळीवर स्कुबा डायव्हिंग सेंटरला मान्यता मिळण्यासाठी लागणारी सर्व मानांकने तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटरने पूर्ण केली आहेत. स्कुबा डायव्हिंग सेंटरमधील स्विमिंग पूल विशेष आकर्षण आहे. या सेंटरमधील क्लासरूम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. या सेंटरमध्ये सुरक्षितता आणि दर्जेदार प्रशिक्षण सुविधा यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. जगभरात १८० देशांपेक्षा जास्त देशांमध्ये पॅडीची मान्यता असलेली स्कुबा डायव्हिंग सेंटर आहेत. आम्हाला तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटरला मान्यता देण्यास विशेष आनंद वाटेल. तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटरवर पॅडीची मुद्रा लागावी अशीच आमची इच्छा आहे, असेही अवूर म्हणाले.महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने तारकर्ली येथे उभारलेल्या आशिया खंडातील पहिल्या स्कुबा डायव्हिंग सेंटरमध्ये अत्यंत दर्जेदार असा १० मीटर खोलीचा स्विमिंग पूल आहे. प्रशस्त क्लासरूम, संगणकीय लॅब, चेंजिंग रूम, आॅक्सिजन युनिट, फिल्टरेशन युनिट यांसह अन्य सुविधा आहेत. या सेंटरने पॅडीचे सर्व निकष पूर्ण केले आहेत. आठवडाभरात स्कुबा डायव्हिंग सेंटरला पॅडीची मान्यता मिळू शकते. पॅडीची मान्यता मिळाल्यानंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत स्कुबा डायव्हिंग सेंटर प्रशिक्षणासाठी खुले होईल, असा विश्वास अवूर यांनी व्यक्त केला.तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरचे उद्घाटन होण्याअगोदरच प्रशिक्षणासाठी आरक्षण सुरू झाले असल्याचे अवूर म्हणाले. जर्मनी येथील जीआयझेड या सागरी संवर्धनावरील प्रोजेक्टने तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेण्यास उत्सुकता दाखवली आहे. याबरोबर पोलीस, नेव्ही, सागर रक्षक दल, आपत्ती व्यवस्थापकांनाही या स्कुबा डायव्हिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेणे शक्य होणार आहे. स्थानिक सागरी पर्यटन व्यावसायिकांनाही सुरक्षिततेबाबत कार्यशाळा घेण्यास पॅडी उत्सुक असल्याचे अॅन्ड्रेस अवूर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
स्कुबा डायव्हिंगला ‘पॅडी’ची मान्यता मिळेल
By admin | Updated: October 31, 2014 00:40 IST