मालवण : नियम धाब्यावर बसवून वेंगुर्ले खवणे किनारपट्टीलगत मिनीपर्ससीन धारकांचा धुमाकूळ सुरु आहे. मत्स्य विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने पारंपरिक मच्छिमारांच्या जाळीतील मासळी हिरावून नेली जात आहे. पारंपरिक मच्छिमारांनी बुधवारी सायंकाळी किनाऱ्यालगत मासेमारी करणारा मिनीपर्ससीन पकडला. त्यानंतर मच्छिमारांनी मत्स्य विभागाशी संपर्क साधूनही याबाबत मत्स्य विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून खवणे येथील मच्छिमारांनी मालवण येथील मत्स्य कार्यालयावर धडक देत तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, मच्छिमारांनी पकडलेला मिनीपर्ससीन संबंधित मालकाने बोट पळवून नेत जाळ्यांचे नुकसान केलात म्हणून गुन्हा दाखल करू अशी धमकी दिल्याचे खवणे येथील मच्छिमारांनी सांगितले आहे. मत्स्य विभागात प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्याने मच्छिमारांनी निवेदन कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे देत कारवाईची मागणी केली आहे.खवणे किनारपट्टीवर पाच नॉटिकल मैल खोल समुद्रालगत मिनीपर्ससीनकडून मासेमारी सुरु आहे. जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार यांच्या उपस्थितीत आचरा येथील राड्यानंतर मच्छिमारांना ठरवून दिलेली हद्द मोडून नियम धाब्यावर बसवत ही मासेमारी सुरु आहे. बुधवारी अशीच मिनी पर्ससीन मच्छिमारांनी पकडली. मत्स्य विभागाशी संपर्क साधूनही अधिकारी उपस्थित न राहिल्याने त्या बोटीवरील जाळी किनाऱ्यावर उतरवून ठेवण्यात आली. यावेळी संबंधित मिनीपर्ससीन मालकाने बोट पळवून नेली. आणि जाळ्यांचे नुकसान केले म्हणून गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. त्यामुळे मिनी पर्ससीनवर कारवाई व्हावी अशी मागणी खवणे येथील २० ते २५ मच्छिमारांनी लावून धरली. मिनीपर्ससीन विरोधात पारंपरिक मच्छिमार पुन्हा आक्रमक झाले आहेत. (प्रतिनिधी)
खवणेत मिनीपर्ससीन पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2016 00:03 IST