सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा येथील एका युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून तुषार उत्तम परब (रा. पेडणे, गोवा) या युवकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या युवतीची अश्लील छायाचित्रेही काढण्यात आली असून, तिने याबाबत सावंतवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेत गुन्हा पेडणे पोलिसांकडे वर्ग केला आहे. दरम्यान, पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतले आहे.आरोंदा येथील युवती पेडणे येथील तुषार परब यांच्या आॅप्टीशियनमध्ये गेली दोन वर्षे काम करत होती. याच काळात तुषारने तिला, ‘मी तुझ्याशी लग्न करणार आहे’, असे सांगत पेडणे येथेच आॅप्टीशियनसह अन्य ठिकाणी नेत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला आणि तिची अश्लील छायाचित्रेही काढली. हा प्रकार डिसेंबर २०१२ पासून १६ सप्टेंबरपर्यंत सुरू होता. तिने अनेकवेळा या युवकाला लग्नाबाबत विचारले; पण त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्या युवतीने सावंतवाडी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तुषारला ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकारानंतर आरोंदा येथे एकच खळबळ माजली असून, गावात दिवसभर याची चर्चा होती. (प्रतिनिधी)
सावंतवाडी : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
By admin | Updated: September 20, 2014 00:33 IST