आरटीपीसीआरमध्ये पॉझिटिव्ह मात्र रॅपिडमध्ये आला निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 02:51 PM2021-06-16T14:51:01+5:302021-06-16T14:53:18+5:30
CoronaVIrus Sindhudurg : सावंतवाडीत एका नगरपालिका कर्मचाऱ्याची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने लागलीच रॅपिड टेस्ट केली; मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्याने तिसऱ्यांदा केलेली चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या तांत्रिक घोळात मात्र कर्मचारी सध्या कोरोना रुग्ण म्हणून मनस्ताप भोगत आहे.
सावंतवाडी : सावंतवाडीत एका नगरपालिका कर्मचाऱ्याची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने लागलीच रॅपिड टेस्ट केली; मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्याने तिसऱ्यांदा केलेली चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या तांत्रिक घोळात मात्र कर्मचारी सध्या कोरोना रुग्ण म्हणून मनस्ताप भोगत आहे.
सावंतवाडी नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याने सावंतवाडीतच आपल्या सहकाऱ्यांसह कोरोना चाचणी करून घेतली. ही चाचणी आरटीपीसीआर स्वरूपाची होती. त्यात त्याचा अहवाल दोन दिवसांनी आला आणि तो पॉझिटिव्ह होता. त्या मुळे तो एकदमच कोलमडून गेला. त्याचे घर ही कन्टेनमेंट झोन करण्यात आले. तसेच त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले. मात्र त्याने आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्याने रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने लागलीच रॅपिड टेस्ट केली. मात्र ती निगेटिव्ह आली.
पहिल्या टेस्टचा अहवाल येण्यास दोन दिवस उशीर लागतो. त्यामुळे त्याला विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले. त्याने या सर्व घोळात तिसऱ्यांदा आरटीपीसीआर चाचणी केली असता त्यात तो निगेटिव्ह आल्याने त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला खरा पण पहिल्या चाचणीत तो पॉझिटिव्ह आल्याने कोरोना रुग्ण म्हणून त्यांचे नाव आल्याने तो सध्या मनस्ताप सहन करत आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून झालेली ही तांत्रिक चूक मानायची की तो खराच पॉझिटिव्ह होता हे कोडे मात्र सुटू शकले नाही. मात्र असा प्रकार अनेकांच्या बाबतीत होतो. नंतर अनेकांना सर्व गोष्टीचा मनस्ताप ही सहन करावा लागतो.